गडचिरोली | Crime News : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री केली जात आहे. सिरोंचा तालुक्यातील बामणी उपपोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या जाफराबाद येथे स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत तब्बल 14 लाख 47 हजार रुपयांचा देशी-विदेशी दारू जप्त केली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, 27 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जाफराबाद येथील संदीप देवाजी दुर्गम यांच्या घरावर धाड टाकली. विक्रीकरिता अवैधरित्या त्याने मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली देशी-विदेशी दारू बघून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चक्रावून गेले. त्यांच्या धाडीत ऑफिसर चॉईस कंपनीचे सिलबंद बॉटल 11,136 नग ( प्रति नग अवैध विक्री किंमत अंदाजे 130 रुपये प्रमाणे एकूण 14 लाख 47 हजार 680) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. मात्र पोलिसांची चुणूक लागल्याने आरोपी अगोदरच पसार झाला होता.
या घटनेच्या अनुषंगाने, उप पोलीस स्टेशन बामणी येथे कलम 65 (ई ) महा.दा.का.अन्वये आरोपी संदीप देवाजी दुर्गम रा.जाफराबाद, तालुका सिरोंचा, जिल्हा गडचिरोली याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर फरार आरोपीचा शोध सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास उप पोलीस स्टेशन बामणी येथील पोलीस उपनिरीक्षक शाहू दंडे करीत आहेत. सदर कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एस.रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पार पडली.
स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणाली प्रश्नचिन्ह
बामणी उप पोलीस स्टेशन अंतर्गत बऱ्याच गावांमध्ये सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याची खमंग चर्चा होती. विशेष म्हणजे, जाफराबाद सारख्या छोट्याशा गावात एकाच घरात 14 लाखांचा देशी-विदेशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवली होती. ही फार गंभीर बाब आहे. मात्र, स्थानिक पोलिसांना याची माहिती का नाही? उप पोलिस स्टेशन असताना देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना धाड टाकून कारवाई करावी लागत आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.