Shirgaon Beef seized : महाड तालुक्यातील शिरगाव चेकपोस्ट परिसरात गोवंशीय मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ६५ किलो मांस व एक चारचाकी वाहन जप्त केले असून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई रविवार १५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास करण्यात आली. हिंदूच्या पवित्र महाशिवरात्री दिवशी गोमांस जप्त करण्यात आलं आहे. त्यामुळे हे प्रकार चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा – अमरावती दरोडा उघड! ४८ तासांत ७ आरोपी जेरबंद, १.१२ कोटींचा मुद्देमाल जप्त
या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीत जफर अब्दुल मज्जीद गिते रा. जुई मोहल्ला, जुई महाड. आणि शहेबाज अब्दुल्ला मुंडे रा. जुई, महाड. यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
१ लाख १६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
संशयितांकडून सुमारे १६ हजार २५० रुपये किंमतीचे अंदाजे ६५ किलो गोवंशीय मांस तसेच सुमारे एक लाख रुपये किंमतीचे महिंद्रा जितो कंपनीचे वाहन (क्रमांक MH 06 BU 1766) असा एकूण १ लाख १६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात संबंधित मांस विक्रीच्या उद्देशाने वाहनातून वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली असून प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवराम खाडे करीत आहेत.
हिंदूंच्या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशीच घडला प्रकार
हिंदूंच्या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशीच घडलेल्या या संवेदनशील स्वरूपाच्या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिस कारवाईची माहिती मिळताच मोठ्या संख्येने गोरक्षक शिरगाव चेकपोस्ट नाक्यावर जमा झाले होते, दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी गोरक्षकांकडून करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.












