• Home
  • ताज्या बातम्या
  • Nashik Crime News: ‘घरी पैशांचा पाऊस पडेल’ म्हणत साडेसात लाख उकळले; नाशिकच्या भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हा

Nashik Crime News: ‘घरी पैशांचा पाऊस पडेल’ म्हणत साडेसात लाख उकळले; नाशिकच्या भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime News
20
Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया सविस्तर.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर पुन्हा एकदा भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अघोरी पूजेच्या माध्यमातून आजार बरा करण्यासह घरी पैशांचा पाऊस (Money Rain Scam) पाडण्याचे आमिष दाखवून पनवेलमधील एका महिलेला तब्बल साडेसात लाख रुपयांचा गंडा (Nashik Crime News) घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Nirmoolan Samiti) पाठपुराव्यानंतर नाशिकमधील संशयित अरुण धोंडू पाटील याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Nashik Fraud) करण्यात आला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया सविस्तर.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथे राहणारी एक महिला अस्थमाच्या आजाराने त्रस्त होती. याचदरम्यान तिला नाशिकच्या ( Nashik Latest Crime News ) गंगापूर परिसरात राहणाऱ्या अरुण धोंडू पाटील याच्याकडे दैवी शक्ती असल्याची माहिती मिळाली. संबंधित व्यक्तीने पूजाविधीच्या माध्यमातून आजार बरा करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: Pune University Exam 2026 : ऐन परीक्षेच्या काळात मोठा निर्णय! पुणे विद्यापीठाच्या २३ ऑक्टोबरच्या परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन तारखा कधी जाहीर होणार?

महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी तिला आणि तिच्या पतीला पनवेलहून नाशिकला आणण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रवासादरम्यान दोघांच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. नाशिकमध्ये कथित पूजाविधी केल्यानंतर त्यांना पुन्हा पनवेलला सोडण्यात आले. दुसऱ्यांदा असाच विधी करण्यात आला. त्यानंतर आजारात सुधारणा झाल्याचा भास झाल्याने महिलेचा संबंधित व्यक्तीवरील विश्वास वाढल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; अघोरी पूजेचा प्रकार

महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित व्यक्तीने दैवी आणि अघोरी शक्तींच्या माध्यमातून घरात पैशांचा पाऊस पाडता येईल, असे आमिष दाखवल्याचा आरोप आहे. यासाठी महिलेला मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे आणण्यास सांगण्यात आले.

त्यानंतर महिलेला आणि तिच्या पतीला पुन्हा नाशिकला आणण्यात आले. गंगापूर रोड परिसरातील बालाजी मंदिराजवळ कथित अघोरी पूजाविधी करण्यात आला. या वेळी महिलेला अंगावरील कपडे बदलून पांढरे, पारदर्शक वस्त्र परिधान करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे.

पूजेदरम्यान मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू, गुलालाचे पाणी आणि बुक्का यांसारख्या वस्तूंचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पाच लाख रुपयांची पूजा; तीन विधींसाठी साडेसात लाख रुपये

या कथित विधीसाठी महिलेने दिलेल्या पाच लाख रुपयांची पूजा करण्यात आली. सुमारे दोन तास मंत्रोच्चार सुरू होते. यावेळी बोकडाचा बळी देण्यात आल्याचाही आरोप आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर घरी गेल्यावर पैशांचा पाऊस पडेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर महिलेला आणि तिच्या पतीला पुन्हा पनवेलला सोडण्यात आले.

या प्रकरणात तीन पूजाविधींसाठी एकूण साडेसात लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, आश्वासन दिल्याप्रमाणे घरात पैशांचा पाऊस पडला नाही आणि महिलेचा आजारही बरा झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, संबंधित व्यक्तीकडून टाळाटाळ करणारी उत्तरे मिळत असल्याचा आरोप आहे.

महाराष्ट्र अंनिसच्या पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल

या प्रकाराची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: दसऱ्यापासून ‘या’ 6 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस? धनलाभापासून करिअरमधील प्रगतीपर्यंत, जाणून घ्या भविष्य!

आणखी कोणी फसवणुकीचे बळी ठरले असल्यास तक्रार करण्याचे आवाहन

दैवी किंवा अघोरी शक्तींच्या नावाखाली पूजाविधी करून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आपली फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

या घटनेमुळे आजार बरा करण्याच्या किंवा कमी वेळेत मोठी रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक होण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संशयितावरील आरोपांची पुढील चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts