Women’s U19 T20 World Cup 2027: आयसीसीने १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक २०२७ चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. गतविजेत्या टीम इंडियाची पहिली लढत २२ जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध रंगणार आहे. बांगलादेश आणि नेपाळमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारत कोणत्या गटात आहे आणि संपूर्ण वेळापत्रक काय आहे? चला, जाणून घेऊया.
Women’s U19 T20 World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आयसीसीने १९ वर्षांखालील महिला टी २० विश्वचषक २०२७ चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बांगलादेश आणि नेपाळमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत १६ संघ विजेतेपदासाठी भिडणार आहे. गतिविजेत्या भारतीय संघाचा पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध रंगणार असून, टीम इंडियाचा कोणत्या गटात समावेश आहे. आणि उपांत्य फेरीसह अंतिम सामना कधी होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती.
भारतासह १६ संघांचा स्पर्धेत सहभाग
आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी २० विश्वचषकाचा तिसरा हंगाम २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. बांगलादेश आणि नेपाळ या दोन देशांमध्ये स्पर्धेतील सामने खेळवले जाणार आहेत. एकूण १६ संघांमध्ये ४१ सामने होतील.
हेही वाचा: आव्हाडांना गोळ्या घालण्याची धमकी, पुण्यात भाड्याने राहणारा सिक्युरिटी सुपरवायझर पोलिसांच्या जाळ्यात!
या स्पर्धेसाठी संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात चार संघ असतील. साखळी फेरीतील सामने २६ जानेवारीपर्यंत खेळवले जातील. त्यानंतर पात्र संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील. या टप्प्यातील कामगिरीच्या आधारे उपांत्य फेरीचे संघ निश्चित होतील.
टीम इंडिया कोणत्या ग्रुपमध्ये?
गतविजेत्या भारतीय संघाचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला आहे. भारताला या गटात वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि यजमान नेपाळ यांचं आव्हान असणार आहे.
स्पर्धेतील चार गट पुढीलप्रमाणे आहेत
गट अ: भारत, वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि नेपाळ
गट ब: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि सामोआ
गट क: ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE)
गट ड: इंग्लंड, श्रीलंका, अमेरिका आणि स्कॉटलंड
भारतीय संघाने यापूर्वी झालेल्या २०२३ आणि २०२५ या दोन्ही स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याचं लक्ष्य भारतीय युवा खेळाडूंसमोर असेल.
भारताचा पहिला सामना कधी होणार?
भारतीय संघाच्या विश्वचषक मोहिमेला २२ जानेवारी २०२७ रोजी सुरुवात होईल. काठमांडू येथील टीयू आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना खेळवला जाणार आहे.
टीम इंडियाचे साखळी फेरीतील सामने पुढीलप्रमाणे आहेत:
२२ जानेवारी २०२७: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
२४ जानेवारी २०२७: नेपाळ विरुद्ध भारत
२६ जानेवारी २०२७: भारत विरुद्ध आयर्लंड
हे तिन्ही सामने काठमांडू येथील टीयू आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नियोजित आहेत. घरच्या वातावरणासारख्या परिस्थितीत खेळण्याची संधी मिळत असल्याने भारतीय संघाच्या कामगिरीकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असेल.
पहिल्याच दिवशी चार सामने
२१ जानेवारी रोजी स्पर्धेचा प्रारंभ चार सामन्यांनी होणार आहे. पहिल्या दिवशी विविध गटांतील संघ मैदानात उतरतील.
बांगलादेश विरुद्ध संयुक्त अरब अमिराती
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नायजेरिया
श्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड
इंग्लंड विरुद्ध अमेरिका
त्यानंतर २२ जानेवारी रोजी भारतासह इतर संघांचे सामने होतील. यजमान नेपाळचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंड आणि सामोआ यांच्यातही लढत रंगेल, तर दक्षिण आफ्रिका पाकिस्तानशी भिडणार आहे.
हेही वाचा: Zomato-Swiggy चं टेन्शन वाढणार! Flipkart आणतेय ‘Eat-in by Minutes’ फूड डिलिव्हरी सेवा
सुपर सिक्सनंतर उपांत्य फेरीची लढत
साखळी फेरी संपल्यानंतर पात्र संघ सुपर सिक्स टप्प्यात प्रवेश करतील. या टप्प्यात संघांची दोन गटांमध्ये विभागणी होईल. सुपर सिक्समधील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
उपांत्य फेरीचे दोन्ही सामने ४ फेब्रुवारी २०२७ रोजी बांगलादेशमधील चट्टोग्राम येथे खेळवले जाणार आहेत. सामन्यांमध्ये व्यत्यय आल्यास ५ फेब्रुवारी हा राखीव दिवस असेल.
स्पर्धेचा अंतिम सामना ६ फेब्रुवारी २०२७ रोजी चट्टोग्राममध्ये होणार आहे. अंतिम सामन्यासाठी ७ फेब्रुवारी हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
युवा महिला क्रिकेटपटूंना मोठी संधी
आयसीसीच्या या स्पर्धेमुळे जगभरातील युवा महिला क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. विविध देशांतील खेळाडूंना मोठ्या स्पर्धेचा अनुभव मिळण्यासोबतच महिला क्रिकेटच्या विकासालाही चालना मिळेल.
आता भारतीय संघ विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीची कसोटी लागणार असून, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यापासूनच विजेतेपदाच्या मोहिमेला सुरुवात होईल.



