Ghaziabad Girls Suicide Case : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिघीही ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाधीन होत्या. त्यांच्या कुटुंबानं त्यांच्या गेमिंगला विरोध केल्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं वृत्त आहे. या तिन्ही बहिणी 16, 14 आणि 12 वर्षांच्या आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी एक सुसाईड नोट लिहिली आणि ती त्यांच्या खोलीत सोडली.
सुसाईड नोट आली समोर :
सुसाईड नोटमध्ये मुलींनी लिहिलं, “माफ करा, आई आणि बाबा, मी खेळणं सोडू शकत नाही.” सुसाईड नोटमध्ये असंही म्हटलं आहे की, “या डायरीत लिहिलेलं सर्व काही खरं आहे. कृपया ते वाचा. आता वाचा… माफ करा, आई आणि बाबा…” कोविड-19 साथीच्या काळात तिन्ही बहिणींना मोबाईल गेमचं व्यसन लागलं होतं असं वृत्त आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांना यासाठी फटकारलं तेव्हा त्यांनी काल रात्री 2 वाजताच्या सुमारास नवव्या मजल्यावरुन एकत्र उडी मारली. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट देखील जप्त करण्यात आली. सुसाईड नोटनुसार, आत्महत्या मोबाईल गेमिंग अॅपमुळे झाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुलींनी खेळला कोरियन लव्हर गेम :
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या तिला मोड पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या भारत सिटी सोसायटीमध्ये आत्महत्या करणाऱ्या तिन्ही मुलींनी काल रात्री 2 वाजताच्या सुमारास 9 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या तिन्ही बहिणी ऑनलाइन टास्क-आधारित कोरियन लव्हर गेम खेळायच्या. या तिन्ही बहिणींनी एकत्र आत्महत्या केली.
पोलिसांचं निवेदन काय :
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते ऑनलाइन कोरियन गेमच्या व्यसनाच्या दृष्टिकोनाचाही तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त (शालिमार गार्डन) अतुल कुमार सिंह म्हणाले की, प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की बहिणी ऑनलाइन कोरियन गेमच्या व्यसनाधीन होत्या आणि त्यांच्या पालकांनी त्यांच्या अतिरेकी गेमिंगला आक्षेप घेतला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 दरम्यान या बहिणी ऑनलाइन गेमच्या व्यसनाधीन झाल्या होत्या आणि त्या वारंवार कोरियन गेम खेळत होत्या. अधिकाऱ्यांनी सांगितलं की पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरु केली आहे आणि घटनेचं कारण तपासत आहेत.






