या डिजिटल युगात आता चोर देखील डिजिटल झाल्याचे दिसते. पूर्वी आपण घरफोडी, चोरी अशा घटना ऐकायचो परंतु आता आपल्याला डिजिटल चोरीच्या घटना ऐकायला येतात जसे कि सायबर क्राईम. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड येथून समोर आली आहे. या ठिकाणी चोरटयांनी गुगल मॅपचा वापर करून घरफोडी केल्याची घटना घडली आहे. परंतु पिंपरी चिंचवड शाखेच्या युनिट 5 च्या पोलिसांनी स्मार्ट आणि अत्यंत बारकाईने तपस करत चोरट्याने अटक केली आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात गुगल मॅपचा वापर करून घरफोडी करण्यात आली आहे. या चोरट्यांना पिंपरी चिंचवड शाखेच्या पोलिसांनी स्मार्ट पद्धतीने जेरबंद केले आहे. हे दोन्ही चोरटे राजस्थान मधील असून पोलिसांनी त्यांना केवळ एका तांत्रिक माहितीच्या आधारावर आणि 100 ते 120 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहे.
काय आहे प्रकरण :
आनंद सिंग पर्वत सिंग सरदार आणि गुरुदीप आनंद अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी चोरी करण्यासाठी विशेष नियोजन केले होते. त्यांनी राजस्थान आणि मध्य प्रदेशातून खासगी बसने प्रवास करत पिंपरी-चिंचवड शहर गाठले आहे. त्यानंतर आल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी एक युक्ती लढवली. शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्काम करण्यासाठी त्यांनी बनावट आधार कार्ड वापरून खोली आरक्षित केली होती. यामुळे त्यांची खरी ओळख लगेच उघड होऊ शकली नाही.
या चोरटयांनी चोरी करण्यासाठी जी नवी पद्धत वापरली आहे, ती पोलिसांसाठी देखील आश्चर्यचकित करणारी आहे. सर्वप्रथम हे चोरटे गुगल मॅपच्या मदतीने शहरात असलेल्या उच्चभ्रू आणि सुरक्षित सोसायट्या शोधायचे. या सोसायट्यांमध्ये घरफोडी करणे सोपे जावे हे त्यांचा उद्धेश होता. तसेच चोरीची घटना यशस्वी झाल्यानंतर पकडले जाऊ नये म्हणून, आरोपी गुगल मॅपवरच पळून जाण्यासाठी सोयीस्कर आणि कमी गर्दीचे रस्ते किंवा मार्ग निश्चित करत होते. अशाप्रकारे संपूर्ण नियोजन करून ते थेट सोसायटीमध्ये प्रवेश करत असत, आणि घरफोडी करून लगेच पसार व्हायचे. त्यांची ही कार्यपद्धती अत्यंत जलद आणि पद्धतशीर होती.
ही घटना घडल्यानंतर चोरट्यांचा स्मार्ट वापर पाहून पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले होते. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली होती. या गुन्हेगारांच्या हालचाली आणि मार्गाचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 100 ते 120 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज शोधले. त्यानंतर पोलिसांना सीसीटीव्ही च्या माध्यमातून संशयित हालचाल दिसून आली. त्यानंतर त्यांनी अत्यंत गुप्तरित्या आरोपीना ताब्यात घेतले.