अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या हा झुंड चित्रपटातील एका कलाकाराची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. झुंड चित्रपटात विनोदी अभिनय करून प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात राहिलेल्या प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीची हत्या झाल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या हिंदी चित्रपटातील प्रियांशू क्षत्रिय याची नागपूरमध्ये जरीपटका या परिसरात हत्या झाली. प्रियांशूचा मित्र ध्रुव साहू याने त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रियांशु क्षत्रिय आणि त्याचा मित्र ध्रुव साहू यांच्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दारुच्या नशेत वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने ध्रुव साहू याने प्रियांशूवर धारदार शस्त्राने वार करुन त्याला जखमी केले. या घटनेनंतर प्रियांशु क्षत्रिय याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी ध्रुव साहूला अटक केली असून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे होते. त्यांनी स्थानिक तरुणांना घेऊन चित्रपटाचे चित्रीकरण नागपूरमध्ये पूर्ण केले होते. त्याला झुंड चित्रपटात काम मिळाल्याने बऱ्याच जणांनी आश्चर्य व्यक्त केले होते. ही घटना घडली त्या ठिकाणी पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर प्रियांशू उर्फ बाबू छत्री हा अर्धनग्न अवस्थेत आढळला. त्यावेळी त्याच्या अंगावर प्लॅस्टिक गुंडाळलेले होते. या परिसरातील लोकांना त्याच्या ओरडण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन बाबू छत्रीला तातडीने मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.