कोल्हापूर | Crime News : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत असून पतीनेच पत्नीची कोयत्याने वार करून हत्या केली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील व्यक्तीने आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली त्यानंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून पत्नीची निर्घृण हत्या केली. रोहिणी पाटील असं मृत महिलेचे नाव आहे, तर प्रशांत पाटील असं पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. प्रशांतने रोहिणीची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, पळून गेलेल्या प्रशांत पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलं.
आधी डोळ्यात टाकली चटणी टाकली अन् गेल्यावर सपासप वार
समोर आलेल्या माहितीनुसार,हातकणंगले तालुक्यातील भादोले गावच्या हद्दीत रोहिणी प्रशांत पाटील (वय २८) हिच्या डोळ्यात तिचा पती प्रशांत पाटील याने आधी रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकली, त्यानंतर कोयत्याने वार केले. ही घटना काल (सोमवारी, ता २९) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद वडगाव पोलिसात रात्री उशिरा करण्यात आली. दरम्यान, आरोपी प्रशांत हा खून करून फरार झाला होता. त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
गळ्यावर व चेहऱ्यावर वार
दरम्यान, घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भादोले येथील प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी हिच्यासमवेत तिच्या माहेरी ढवळी (जि. सांगली) येथे वडील आजारी असल्याने आठवडाभरापासून ये-जा करत होता. सोमवारी सायंकाळी ढवळी येथून पती-पत्नी दोघे भादोलेला मोटारसायकलने येत होते. दरम्यान, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते कोरेगाव भादोले रस्त्यावर झुंजीनाना मळ्याजवळ हे दोघे आले असता प्रशांत याने रोहिणी हिच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून तिला संपवलं. त्यानंतर तेथून भादोले येथे येऊन त्याने गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच-सहा महिने येणार नाही, असे सांगून पळून गेला होता. या घटनेने गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच, वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपी प्रशांत पाटील याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.