पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात खुनाच्या घटना सतत ऐकण्यास येत आहे. शहरात गुन्हेगारी प्रचंड वाढलेली असताना आता ऐन दिवाळीच्या काळात एक भयानक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड भागात पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना निदर्शनास आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने कंटाळून पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नकुल आनंद भोईर असे या मृत व्यक्तीचे नाव असून चैताली भोईर असे हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. या संपूर्ण घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या वेळी पावणे तीनच्या सुमारास मृत नकुल आणि आरोपी चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेले आणि रागाच्या भरात पत्नीने पती नकुलचा कापडाने गळा आवळून खून केला. या नवरा बायकोला दोन लहान मुले आहेत. या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतले. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.
मृत नकुल भोईर हा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याने मराठा क्रांती मोर्चाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला होता. राजकीय नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध होते. हा सामाजिक वारसा पुढे चालवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला नगरसेवक म्हणून उभे करायचे ठरवले होते. त्यानुषंगाने आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पत्नीला नगरसेवक पदासाठी उभे करणार होता. परंतु त्यापूर्वीच पत्नीने चारित्र्यावर संशय घेतल्याच्या कारणाने त्याचा गळा आवळून खून केला.












