Pune Police Drink and Drive Warning : ड्रिंक अँड ड्राईव्हसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पुणे शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. मागील वर्षभरात ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात तब्बल सहा हजार नागरिकांना पकडण्यात आले होते. त्यावर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये उपमहापौर पदाबाबत मोठा ट्विस्ट, ऐनवेळी उमेदवार बदलला
ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील सर्व आरोपींचे आज समुपदेशन व प्रशिक्षण घेण्यात आले. यापुढे दर आठवड्याला ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये सापडणाऱ्या चालकांना सोमवारी बोलावून त्यांचे प्रशिक्षण व मनपरिवर्तन केले जाणार आहे. दारू पिऊन वाहन चालवू नये, हा संदेश नागरीकांच्या मनात बिंबवण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. या मनपरिवर्तन मोहिमेमुळे शहरात वाहतुकीला शिस्त लागेल, अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि भविष्यात कोणीही दारू पिऊन गाडी चालवणार नाही, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालवणारे तसेच इतर गंभीर वाहतूक नियमभंग करणाऱ्यांसाठीही पुढील काळात प्रशिक्षण व समुपदेशन कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. वेगमर्यादा उल्लंघन, सिग्नल तोडणे व इतर वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्ती व परवाना निलंबनाचीही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.












