Satara doctor suicide case : काल सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात महिला डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेत आता मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी लपून बसलेल्या प्रशांत बनकर या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरा आरोपी पिएसआय गोपाल बदने हा आरोपी २४ तासांपासून फरार आहे.
साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर तरुणीने सुसाईड नोट लिहून तिचे जीवन संपवले होते. प्रशांत बनकर हा महीला डॉक्टर मुलगी राहत असलेल्या बिल्डिंगच्या मालकाचा मुलगा असून या सुसाईड नोटमध्ये तिने प्रशांत बनकर आणि पोलीस निरीक्षक यांनी अत्याचार केल्याचे म्हटले होते. या सुसाईड नोटमध्ये प्रशांत याने आपल्यावर शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप तरुणीने लगावला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आरोपी प्रशांत बनकर ला फोन केला. त्यानंतर दोघांमध्ये मेसेज द्वारे संवाद देखील झाला होता. महिला डॉक्टर फलटण येथील प्रशांत बनकर च्या वडिलांच्या फ्लॅटमध्ये भाडेकरू म्हणून राहत होती. आरोपी प्रशांत बनकर याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून त्याच्यावर मुद्दाम असे आरोप करण्यात येत असल्याचे वक्तव्य आई-वडिलांनी केले आहे. ‘माझा मुलगा पुण्यात असतो दिवाळीसाठी तो चार ते पाच दिवसापासून घरीच होता , तो असं करणार नाही’ असे ते म्हणालेत.
‘महिला डॉक्टरच्या हातावर जे नाव लिहिले आहे ते तिनेच लिहिले आहे का की दुसऱ्या कोणीतरी तिच्या हातावर नाव लिहिले आहे याचा तपास झाला पाहिजे, आम्हाला वाटतं कुणाच्यातरी दबावाखाली हे नाव लिहिण्यात आली आहेत, पोलिसांनी याविषयी योग्य तपास करावा’ अशी मागणी प्रशांत बनकर यांच्या आईने केली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी पीएसआय गोपाल बदने हा फरार असून त्याने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचे महिला डॉक्टरने सुसाईड नोट मध्ये लिहिले होते. पीएसआय गोपाल बदने या आरोपीचे शेवटचे मोबाईल लोकेशन पंढरपूर येथे आढळून आले असल्याची माहिती समोर आली आहे.












