Shirpur dumper theft gang arrested : धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्यातील डंपर चोरी करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. दोन हायवा डंपर आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिरपूर शहरातील करवंद नाका येथील एचपी पेट्रोल पंपासमोरून एमएच-18 बीजेड 5114 क्रमांकाचा डंपर तसेच शिरपूर-शहादा रोडवरील पटेल सर्विस सेंटरसमोरून एमएच-18 बीएच 1718 क्रमांकाचा दुसरा डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि फास्टॅगची माहिती तपासली.
पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका रवींद्र आखडमल आणि तपास पथकाने घटनास्थळ व परिसरातील कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली. तसेच गुप्त माहितीच्या आधारे तपासाची गती वाढवण्यात आली. तपासात महावीर प्रसाद भवरलालजी शर्मा (भीलवाडा, राजस्थान), इरफान उस्मान मेव (नूह, हरियाणा), नियामत दिनू मेव (पलवल, हरियाणा) आणि कालू गफूरखों मेव (भीलवाडा, राजस्थान) यांनी संगनमताने चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींनी HR-52G-7875 क्रमांकाच्या मारुती सुझुकी बलेनो कारचा वापर करून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. राजस्थानमधील भीलवाडा येथे दोन पंचांच्या उपस्थितीत दोन्ही हायवा डंपर आणि संबंधित कार जप्त करण्यात आली. त्यानंतर चारही आरोपींना शिरपूर येथे आणून अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोहेका रवींद्र आखडमल करीत आहेत.












