Maharashtra Police call center fraud : शहरातील चर्चित बनावट कॉल सेंटर फसवणूक प्रकरणात नवा मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात अमेरिकन तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना ई-मेलद्वारे काही महत्त्वाची माहिती पाठवली आहे. या मेलमध्ये फसवणुकीचे बळी ठरलेल्या अमेरिकन नागरिकांची प्राथमिक यादी समाविष्ट असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. या घडामोडीनंतर या प्रकरणाच्या तपासाला आता नवा वेग मिळाला आहे.
यूएसकडून आलेल्या मेलमुळं नवे धागेदोरे :
पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी गीता बागवडे यांनी गुरुवारी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात या माहितीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, अमेरिकेतील फसवणूक झालेल्या व्यक्तींची नावं आणि प्राथमिक तपशील महाराष्ट्र पोलिसांना ई-मेलद्वारे प्राप्त झाले आहेत. या यादीत किती लोकांना फसवलं गेलं याची प्राथमिक माहिती नमूद करण्यात आली असून, संपूर्ण तपशील अमेरिकेकडून लवकरच मिळणार असल्याचंही त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं. या अपडेटनंतर या प्रकरणाचा तपास आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्वाचा टप्पा गाठत आहे.
आरोपीच्या वकिलांचा दावा, फसवणुकीचा पुरावा नाही :
दरम्यान, आरोपी फारुकीच्या वतीनं ॲड. पद्मभूषण परतवाघ यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितलं की, 28 ऑक्टोबरपासून आजपर्यंत एकही व्यक्ती फसवणुकीची तक्रार घेऊन पोलिसांकडे आलेली नाही. पोलिसांनी जरी काही लॅपटॉप आणि वाहनं जप्त केली असली, तरी कोणताही प्रत्यक्ष तक्रारदार पुढं आलेला नाही. राज्यात किंवा देशात एक रुपयाचीदेखील फसवणूक झाल्याचं कोणतेही ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आरोपीला 8 नोव्हेंबरपर्यंत कोठडी :
या युक्तिवादावर प्रत्युत्तर देताना तपास अधिकारी बागवडे यांनी स्पष्ट केलं की, अमेरिकन अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र पोलिसांना पाठवलेला ई-मेल हा या गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावा ठरु शकतो. या मेलच्या आधारे फसवणुकीचा तपास आता अधिक सखोल पद्धतीनं होणार आहे. सर्व कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासले जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. न्यायालयानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून आरोपी फारुकीला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले. पोलिसांकडून आता अमेरिकन यंत्रणांशी समन्वय साधून फसवणुकीची संपूर्ण यादी मागवण्यात येणार आहे.
तपासाचा पुढचा टप्पा आंतरराष्ट्रीय पुरावे गोळा करणे (Maharashtra Police call center fraud)
या प्रकरणात पोलिसांनी आधीच काही संगणक, वाहनं आणि मोबाईल डिव्हाइसेस जप्त केली आहेत. अमेरिकेकडून मिळालेल्या यादीमुळे आता सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणं अधिक सोपं होणार आहे. असं दिसतं की या कॉल सेंटर प्रकरणाचा तपास स्थानिक चौकशीच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्ह्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. एकंदरीत, या नव्या मेलमुळं कॉल सेंटर फसवणूक प्रकरणाच्या तपासाला नवा आयाम मिळाला आहे. आता अमेरिकन अधिकाऱ्यांकडून संपूर्ण यादी आल्यानंतरच या प्रकरणाचा खरा विस्तार आणि नुकसानाचे प्रमाण स्पष्ट होईल.ट










