Murder of wife’s lover : पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून एका व्यक्तीने तिच्या प्रियकराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह गाडीत शेजारी बसवून तब्बल १९१ किलोमीटरचा प्रवास केल्याचा थरारक प्रकार समोर आला असून, पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पत्नीचे मृत व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात आरोपीने प्रियकराची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट न लावता, तो गाडीतच शेजारी बसवून प्रवास सुरू ठेवला. बाहेरून पाहता काहीही संशयास्पद न वाटावे यासाठी आरोपीने अत्यंत थंड डोक्याने हा प्रवास केल्याचे तपासात समोर आले आहे.
हेही वाचा – वाघोलीतील बकोरी रोड परिसरात दोन गटांत हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
अनोळखी तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह
मृत व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुखेड गावातील एका विहिरीत अंदाजे २५ ते ३० वयोगटातील अनोळखी तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाचे हातपाय बांधलेले असल्याने हा घातपात असल्याचे स्पष्ट झाला. मात्र, काहीही पुरावे नसल्याने तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढ उभं राहिलं.
टोल नाक्यांवरील नोंदी तपासून आरोपीच्या हालचाली उघड
सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि टोल नाक्यांवरील नोंदी तपासून आरोपीच्या हालचाली उघड झाल्या. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीत मुख्य आरोपीने पत्नीशी संबंध असल्याच्या संशयातून तरुणास होंडा सिटी कारमध्ये जबरदस्तीने बसवून दोरीने हातपाय बांधले व गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेह शेजारी बसवून तब्बल १९१ किलोमीटर प्रवास करत सुखेड येथे आणण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करून तो विहिरीत फेकण्यात आला. आल्याची कबुली आरोपीने दिलीय. हत्या, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि कट रचल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या जलद आणि अचूक तपासाचे नागरिकांकडून कौतुक
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी केलेल्या जलद आणि अचूक तपासाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. अत्यंत गुंतागुंतीचा गुन्हा असतानाही पोलिसांनी कमी वेळेत सत्य बाहेर आणला. नातेसंबंधातील संशय आणि संतापातून घडलेला हा प्रकार समाजाला हादरवणारा असून, कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटू शकत नाही, हे या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.












