शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. कैलाशपूर मनिहार तारा या गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचे संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गाव आणि परिसर या घटनेमुळे हादरून गेले आहे. एका रात्रीत असे काय घडले? की एकाच घरात पती-पत्नी आणि त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण गावात दहशत पसरली आहे. मृतांमध्ये रोज अली (वय ३५), त्यांची पत्नी शहनाज (वय ३२), मोठी मुलगी गुलनाज (वय ११), दुसरी मुलगी तबस्सुम (वय १०) आणि दीड वर्षांचा मुलगा मोईन यांचा समावेश आहे.
रात्री झोपताना सर्व काही बरं होतं
मृताच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “रात्री झोपताना सर्व काही अगदी बरं होतं. सकाळी उशीरापर्यंत दरवाजा उघडला नाही, म्हणून वाजवला मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शंका निर्माण झाली. खिडकीतून डोकावून पाहिलं तर पाचही जण खोलीत निपचित पडलेले दिसले.” त्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन दरवाजा तोडला आणि आतला भयानक घटना समोर आली.
हेही वाचा – नागपूर येथील AIIMS कॉलेजच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या, कारण अस्पष्ट
मृत व्यक्तींचा अंगावर कोणत्याही जखमा नाहीत..
घटनेची माहिती मिळताच इकौना पोलीस, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. घर सील करण्यात आले असून सखोल तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक राहुल भाटी आणि अपर पोलीस अधीक्षक मुकेश चंद्र उत्तम यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पहिल्यांदा पती व पत्नीने मिळून आपल्या तीन मुलांची हत्या केली आणि त्यानंतर त्यांनी स्वत:चा जीव दिला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, मृत व्यक्तींचा अंगावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नसल्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार..
मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विषबाधा, गॅस गळती किंवा अन्य काही कारण असू शकते, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच खरे कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.












