महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात देशी आणि विदेशी मद्याचे दर वाढवले होते. परंतु महाराष्ट्रात आता त्याचा परिणाम मध्याच्या आकडेवारीत दिसून आला आहे. वाशीम जिल्ह्यात ऑगस्ट 2025 मध्ये देशी आणि विदेशी दारूच्या विक्रीत लक्षणीय घट पाहायला मिळाली. पण विशेष म्हणजे बियर च्या विक्रीत 17 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून ग्राहकांचा कल वाढत्या महागाई मुळे स्वस्तातल्या बियर कडे पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2024 मध्ये वाशीम जिल्ह्यात 1 लाख 12 हजार 390 लिटर विदेशी दारू तर याच वर्षी 3 लाख 73 हजार 543 लिटर देशी दारू विकली गेली होती. त्याचबरोबर ऑगस्ट 2025 या वर्षी विदेशी दारूची ही विक्री घटून 93 हजार 636 लिटर दारू विकली गेली तर देशी दारूची विक्री घटून 3 लाख 58 हजार 833 लिटर इतकी झाली आहे. म्हणजेच तब्बल विदेशी दारूत 18 हजार 754 लिटरची घट झाली आहे. टक्केवारीनुसार हि घट 16.69 टक्के आहे. आणि देशी दारूत 14 हजार 710 लिटरची घट झाली आहे. टक्केवारीनुसार देशी दारूत 3.93 टक्क्यांनी घसरण झाली.
देशी आणि विदेशी दारूच्या विक्रीत घट झाल्यानंतर बियर ची विक्री वाढल्याचे दिसत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये 78 हजार 526 लिटर बियर विकल्या गेली होती. यावर्षी ऑगस्ट 2025 मध्ये हि विक्री वाढून 92 हजार 56 लिटर झाली आहे. त्यानुसार बियर विक्रीमध्ये यावर्षी 13 हजार 528 लिटरची वाढ झाली आहे. टक्केवारी नुसार हि आकडेवारी 17.23 टक्के एवढी आहे. ग्राहकांनी माद्यांच्या वाढत्या किमतीमुळे स्वस्तातल्या बियर कडे कल वळवला आहे. सप्टेंबर महिन्यात देखील बियर कडे ग्राहकांचा कल राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सप्टेंबर महिन्यात देशी आणि विदेशी दारूच्या किमतीत आणखी वाढ झाल्यास देशी आणि विदेशी दारूच्या विक्रीत आणखी घट होऊ शकते. आणि यामुळे बियरचा विक्रीत लक्षणीय वाढ होईल. यामुळे देशी विदेशी दारू प्रिय ग्राहकांचा पॅटर्न बदलून बियर कडे त्यांचा कल वाढेल. यामुळे मध्य विक्रेत्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सोलापूर जिल्ह्यात देखील मद्यविक्रीचा दर घसरल्याचे बघायला मिळत आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात 13 हजार 734 लिटर विक्री घटली होती. तर हीच घट जुलै ऑगस्ट महिन्यात 3 लाख 66 हजार लिटर पर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांच्या आधारे मिळाली आहे. याठिकाणी दरवर्षी 350 ते 450 कोटींची दारू विक्री होत होती. परंतु दर वाढीमुळे आता 180 मिलिलिटर दारूची बॉटल खरेदीकडे वाढ झाली आहे. यामुळे मद्यविक्रेत्यांच्या दुकानांवर तळीरामांनी पाठ फिरवल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
मागील वर्षी उत्पादन शुल्क विभागाला 260 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यावेळी हे दर स्थिर असल्याने 385 कोटी कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. परंतु यंदा हे दर वाढल्यामुळे विक्रीत लक्षणीय घट पाहायला मिळाली. परंतु असं असतानाही 510 कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. आता मद्य विक्रेत्यांसोबतच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.