Eligibility Criteria for Teacher Recruitment in Maharashtra: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २१ जून २०२६ रोजी येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊयात यासाठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे.
नुकतंच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) ही २१ जून २०२६ रोजी येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही उद्या २७ मार्चपासून सुरू होणार असून १६ एप्रिलही शेवटची तारीख असणार आहे.
हेही वाचा: Wardha Job Fair 2026: नोकरीची सुवर्णसंधी! वर्धा मध्ये विविध पदांसाठी थेट भरती; नोंदणी प्रक्रिया सुरू
परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यातील सर्व प्रकारच्या (अनुदानित व विनाअनुदानित) तसेच विविध मंडळाच्या आणि माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक पदासाठी नियुक्ती मिळवण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
२ सत्रांमध्ये परीक्षा होणार
ही परीक्षचे वेळापत्रक हे २ सत्रांमध्ये विभागले आहेत. पेपर १ हा सकाळी १०.३० ते १.०० या वेळेत होईल, तर पेपर २ दुपारी २:३० ते ५:०० या वेळेत घेतला जाणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://mahatet.in/ या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळ तपासून अद्ययावत सूचना जाणून घ्याव्यात, असेही परिषदेने स्पष्ट केले आहे. प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात बदल होऊ शकतो, अशी शक्यता नाकारलेली नाही. आता राज्य परीक्षा परिषद वर्षातून दोन वेळा टीईटी घेण्याच्या तयारीत असून, जूननंतर पुढील परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर टीईटी परीक्षा
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर टीईटी परीक्षा अनिवार्य ठरल्यामुळे उमेदवारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत राज्यातील ३७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी सुमारे ४.७५ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती.
यापैकी सुमारे २ लाख उमेदवारांनी पेपर १साठी, तर २.७२ लाख उमेदवारांनी पेपर २साठी अर्ज केला होता. २०१३ पासून आतापर्यंत घेतलेल्या आठ टीईटी परीक्षांमध्ये जवळपास ३० लाख उमेदवारांनी सहभाग नोंदवला असून, त्यापैकी सुमारे १.०६ लाख उमेदवार पात्र ठरले आहेत. एकूण पात्रतेचे प्रमाण सरासरी ३.५ टक्के इतके राहिले आहे.











