Venezuelan President : अमेरिकेच्या लष्करानं व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ओलीस ठेवलं आहे. दोघांनाही देशाबाहेर काढण्यात आलं आहे. शनिवारी सकाळी व्हेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केल्याचे वृत्त समोर आले, परंतु हा हल्ला अमेरिकेने केला आहे याची पुष्टी झाली नव्हती. या हल्ल्यात व्हेनेझुएलाच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं. आता काही तासांनंतर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेतल्याची घोषणा केली.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर सांगितलं की अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या “मोठ्या हल्ल्या”नंतर निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांनी असंही म्हटलं की मादुरो यांच्या पत्नीलाही ताब्यात घेऊन देशाबाहेर नेण्यात आलं आहे. स्फोट हे अमेरिकेचे हवाई हल्ले असल्याची पुष्टी होण्याची वाट पाहत असताना, सीबीएसच्या एका पत्रकारानं वृत्त दिले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील लष्करी तळांसह अनेक ठिकाणी हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. (venezuelan president )
कायदा अंमलबजावणीच्या सहकार्यानं ऑपरेशन :
डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिलं, “अमेरिकेनं व्हेनेझुएला आणि त्यांचे नेते, अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात हल्ला यशस्वीरित्या सुरु केला आहे. मादुरो यांना त्यांच्या पत्नीसह पकडण्यात आलं आहे आणि देशाबाहेर काढण्यात आलं आहे. ही कारवाई अमेरिकन कायदा अंमलबजावणीच्या सहकार्यानं करण्यात आली आहे. तपशील नंतर प्रदान केले जातील. आज सकाळी 11 वाजता मार-ए-लागो येथे एक पत्रकार परिषद होईल. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद! अध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प.”
अमेरिका व्हेनेझुएला हल्ला का करत आहे? :
अमेरिकेनं ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली व्हेनेझुएला हल्ला केला आहे. दोन्ही देशांमधील तणाव अनेक दिवसांपासून वाढत आहे. अमेरिकेनं यापूर्वी ड्रग्ज वाहून नेणाऱ्या कथित व्हेनेझुएलाच्या जहाजांना आणि बोटींना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, शनिवारी (3 जानेवारी) अमेरिकेनं प्रथम व्हेनेझुएलाच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केलं.












