Weight Loss Tips | आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येकाच्या खाण्याच्या सवयी देखील बदलल्या आहेत. बरेच लोक आपल्या नाश्त्यात, जेवणात फास्ट फूडचा (Fast Food) समावेश मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. बरेच लोक सकाळच्या नाश्त्यात तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ खाताना दिसतात. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होताना दिसतो आणि त्यांचे वजन वाढण्यास (Weight Gain) सुरूवात होते. बऱ्याच लोकांसाठी वजन वाढणे ही एक समस्या बनून जाते. तुम्हालाही वजन वाढू द्यायचं नसेल, वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर पौष्टिक अन्न खाणे खूप गरजेचे आहे.
हेही वाचा – उन्हाळ्यात थकवा आणि डिहायड्रेशन जाणवत आहे? हे शीतपेय नक्की प्या, शरीर राहील निरोगी
सकाळचा नाश्ता हा खूप महत्त्वाचा असतो कारण तो आपल्याला दिवसभर ऊर्जा देण्यास मदत करतो. जर तुम्ही नाश्त्यामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश केला तर तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि वारंवार भूकही लागत नाही. तर तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल किंवा नियंत्रणात ठेवायचे असेल तर सकाळी पौष्टिक नाश्ता करणे गरजेचे आहे. चला तर मग आता आपण काही नाश्त्यातील काही पौष्टिक पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जे तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील.
नाश्त्यात समाविष्ट करा पौष्टिक पदार्थ
1. मोड आलेले कडधान्ये आणि पनीर पासून बनवलेली टिक्की – मोड आलेले कडधाने आपल्या आहारत समाविष्ट करणे महत्त्वाचे असते. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तर पनीर देखील एक वजन नियंत्रणात आणण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे उकडलेले कडधान्ये आणि पनीर मसाल्यांमध्ये मिसळून त्याची छान टिक्की बनवा. थोड्या तेलावर ती टिक्की फ्राय करा आणि तुमच्या नाश्त्यात समाविष्ट करा. ही टिक्की तुमच्यासाठी आरोग्यदायी असून खायला एकदम चविष्ट लागते.
2. चणा चाट – तुम्हाला जर नाश्त्यात काही चटपटीत आणि पौष्टिक खायचं असेल तर तुम्ही चणा चाट खाऊ शकता. हरभरा हा फायबर आणि प्रथिने असलेला चांगला स्त्रोत आहे. यासाठी तुम्ही चणे उकडून त्यात लिंबाचा रस टाकून, कांदा, टोमॅटो, चाट मसाला टाकून चणा चाट बनवू शकता. यामुळे तुमचे पोट जास्तवेळ भरल्यासारखे वाटते आणि पचनास देखील मदत होते. तसेच ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
3. मिश्र कडधान्यांचे धिरडे – जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर सकाळच्या नाश्त्यात मिश्र कडधान्यांचे धिरडे समाविष्ट करा. यासाठी मोड आलेले कडधान्ये मिक्सरमध्ये बारीक करून घ्या (मूग,मटकी, हरभरा), त्या पेस्टमध्ये बेसन, दही, मसाले, मीठ आणि पाणी टाकून त्याचे मिश्रण तयार करून घ्या. तव्यावर थोडं तेल टाकून हे मिश्रण सोडून दोन्ही बाजूने भाजून घ्या, अशाप्रकारे धिरडे तयार होते. हे धिरडे खायला चविष्ट लागते सोबतच ते शरीरासाठी पौष्टीक असते. यामुळे आपल्या शरीराला फायबर, पोषक तत्वे मिळण्यास मदत होते.









