Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील ४८ तास राज्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात असून पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील विविध भागांसाठी येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊयात राज्यातील पावसाची A टू Z संपूर्ण माहिती
महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून पुढील ४८ तास अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा: शिंदे गटाची ताकद वाढली; सहा खासदारांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जुन्नरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. अल्पावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले. अनेक ठिकाणी पाण्याचा वेग वाढल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक स्तरावर नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत पुढील 24 ते 48 तास सतर्कतेचा इशारा
मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या दिवशी पावसाच्या सरी बरसल्या. आजही शहरात ढगाळ वातावरण राहण्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील 24 ते 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 24 ते 27 जूनदरम्यान कोकणासह राज्यातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढू शकते.
वैजापूरमध्ये नदीला पूर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील तलवाडा परिसरात सलग दोन तास मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे गळमोडी नदीला पूर आला. नांदगाव-शिऊर महामार्गावरील बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीसाठी उभारलेला तात्पुरता पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. परिणामी या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
जालना शहरात दमदार पावसाची हजेरी
जालना शहर आणि आसपासच्या भागांत मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.










