मुंबई Mumbai Monorail : राज्याची राजधानी मुंबईतील मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. मात्र एमएमआरडीएनं आता ती पुन्हा सुरु करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मोनोरेल कॉरिडॉरची सुरक्षा तपासणी करण्यासाठी एका निवृत्त मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माजी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एक पथक पुढील आठवड्यात सीएमआरएस चाचणी सुरु करेल. या चाचण्या पूर्ण करून आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, एमएमआरडीएनं सेवा बंद केल्यानंतर सुमारे आठ महिन्यांनी, मे महिन्याच्या अखेरपर्यंत मोनोरेल सेवा पुन्हा सुरु करण्याची योजना आखली आहे. देशातील एकमेव चेंबूर-जेकब सर्कल मोनोरेल लाईन तोट्यात चालत आहे आणि तिला प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. मात्र, ही सेवा काही प्रवाशांसाठी बरीच सोयीस्कर ठरते.
हेही वाचा :
पुढील आठवड्यात होणार चाचणी :
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (MMRDA) सूत्रांनुसार, त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील आठवड्यात मोनोरेलची चाचणी सुरु होईल. सीएमआरएस चाचणी ही मोनोरेलच्या संचालनासाठी अंतिम टप्पा मानली जाते. सीएमआरएस अंतर्गत, ट्रॅकची गुणवत्ता, सिग्नलिंग प्रणाली, वीजपुरवठा आणि ट्रेनच्या सुरक्षिततेच्या बाबी (ब्रेकिंग सिस्टीम इत्यादी) यांची बारकाईनं तपासणी केली जाते. स्टेशनच्या पायऱ्या, एस्केलेटर, लिफ्ट, तिकीट काउंटर आणि प्रवेश/निर्गमन गेट्सची सध्या तपासणी सुरु आहे. प्रवाशांची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. सुरक्षा तपासणी आणि प्रमाणीकरणानंतर, मोनोरेल सेवा मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुन्हा सुरु होऊ शकते.
एमएमआरडीएला प्रवासी संख्या वाढण्याची अपेक्षा :
जवळपास आठ महिन्यांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या मोनोरेलला मुंबईकरांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रवासी संख्या वाढवण्यासाठी, मोनोरेलची व्हीएनपी आणि आरसी मार्ग जंक्शन स्थानकं मेट्रो 2बी (अंधेरी पश्चिम-मांडले, मानखुर्द) च्या चेंबूर मेट्रो स्टेशनला एका पादचारी पुलाद्वारे जोडली जातील. चेंबूर मेट्रो स्टेशनदेखील लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळं मेट्रो प्रवाशांना चेंबूर ते जेकब सर्कलपर्यंत मोनोरेलनं प्रवास करता येईल. यामुळं प्रवासी संख्या वाढेल, अशी एमएमआरडीएला आशा आहे.
सप्टेंबर 2025 पासून मोनोरेल बंद :
सप्टेंबर 2025 पासून मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे, ज्यामुळं नियमित प्रवाशांना मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, हा तोट्यात चालणाऱ्या मोनोरेलचे गेल्या वर्षभरात अनेक अपघात झाले आहे. ऑगस्ट 2025 मध्ये मोनोरेलवर एक मोठा अपघात झाला. एकाच दिवसात दोन मोनोरेल गाड्या बंद पडल्या, ज्यामुळं प्रवासी बराच काळ अडकून पडले. अखेर ट्रेनच्या खिडक्या फोडून प्रवाशांना बाहेर काढावं लागलं. या घटनेनंतर, एमएमआरडीएला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं, ज्यामुळं मोनोरेलच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
संपूर्ण मार्गाचं आधुनिकीकरण करण्याचं काम :
अपघातांनंतर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सप्टेंबर 2025 मध्ये मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची घोषणा केली. त्यानंतर, संपूर्ण मार्गाचं आधुनिकीकरण करण्यासाठी, नवीन मोनोरेल गाड्या सुरू करण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी अनेक कामे सुरु करण्यात आली. यामुळं एमएमआरडीएनं मोनोरेल सेवा पूर्णपणे बंद केली होती.





