मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मीक कराड कनेक्शन उघड झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपद गमवावे लागले. 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडे पक्षाने कोणतीच जबाबदारी दिलेली नाही. यामुळे धनंजय मुंडे अस्वस्थ झाले आहेत. अखरे धनंजय मुंडे यांनी मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त केली आहे.
आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. रायगडमधील कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसमोर जबाबदारी देण्याची मागणी केली. यावर योग्य वेळी मुंडेंना संधी देऊ असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिले आहे.रायगडमधील अर्जत पोलीस मैदानात सुनील तटकरेंचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी थेट तटकरे यांना गळ घातली. आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणीच धनंजय मुंडे यांनी तटकरे यांच्याकडे केली. धनंजय मुंडे यांनी मागणी ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या. तटकरेंनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. आमचं चुकलं तर नक्कीच कान धरावा आणि नाही चुकलं तर ठिकच, तरीही चालतच, असे म्हणत धनंजय मुंडे स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला.
धनंजय मुंडेंच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून त्यावर प्रतिक्रिया देखील येत आहेत. मुंडेंच्या या वक्तव्यावरुन आता विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्या वक्तव्यावर भूमिका मांडली.
रोजगार हमीच्या कामावर जा म्हणावं, बाराशी खांदायला, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच, तो माझा प्रश्न नाही, तो राजकीय आणि त्यांचा व्ययक्तिक प्रश्न, असेही त्यांनी म्हटले. मात्र, मराठ्यांना त्रास झाला तर अजित दादाचा कार्यक्रम झाला.इथे मराठ्यांना त्रास झाला तर अजित दादाचा खेळ संपला, असा इशाराही पाटलांनी दिला आहे.
खुमासदार उत्तर देईल – धस
हाताला काम द्या, धनंजय मुंडेंच्या या वक्तव्याबाबत आमदार सुरेश धस यांना विचारले असता, मी आज याबाबत बोलणार नाही, प्रचंड पूर माझ्या मतदारसंघात आलेला आहे. खरडून गेलेल्या जमिनीसंदर्भात मी इथे आलेलो आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली. मात्र, दोन दिवसांत मी यासंदर्भात खुमासदार उत्तर देईल, असेही धस यांनी सांगितले.
कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत येऊ नये-दमानिया
धनंजय मुंडे यांना जनतेच्या कामापासून दूर ठेवावे असं माझं स्पष्ट मत आहे, त्यांचा आता वेळ जात नाही म्हणून मला काहीतरी काम द्या, असं साकडं त्यांनी तटकरेंपुढे घातलं आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, पक्षबांधणी आहे, अशी असंख्य कामे आहेत, अशी पक्षाची कामे त्यांनी करावीत.पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली.
अजित पवारांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली
धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल, असे म्हणत अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत.