illegal call center scamming Americans: राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलिसांनी एका बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापा टाकला आणि एक संघटित सायबर फसवणूक नेटवर्क उघडकीस आणलं आहे. चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील तीन मजली इमारतीत असलेल्या या कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांना लक्ष्य केलं जात होतं.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कर्मचारी स्वत:ला प्रतिष्ठित कंपन्या किंवा संस्थांचे प्रतिनिधी म्हणून ओळख करुन गिफ्ट कार्ड किंवा बक्षिसं देण्याचे आमिष दाखवून लोकांना त्यांचं बँक तपशील आणि कार्ड माहिती मिळवून देत होते. त्यानंतर, पीडितांच्या खात्यांमधून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले.
छाप्यात 100 हून अधिक तरुणा ताब्यात :
या कारवाईत, पोलिसांनी कॉल सेंटरमध्ये कॉल ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या 100 हून अधिक तरुणींना ताब्यात घेतलं. यातील बहुतांश तरुणी या उत्तर-पुर्व भारतातील असल्याचं सांगण्यात आलं. घटनास्थळी अनेक पोलीस पथकं उपस्थित होती आणि संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांना सांगण्यात आलं होतं की त्या एका कायदेशीर ग्राहक सेवा केंद्रात काम करत आहेत, परंतु तपासात संपूर्ण ऑपरेशन बेकायदेशीर कामांसाठी वापरलं जात असल्याचं उघड झालं.
पोलिसांकडून संगणक, मोबाइल फोन आणि सर्व्हर जप्त :
छाप्यादरम्यान, पोलिसांनी अनेक संगणक, मोबाइल फोन, सर्व्हर आणि रेकॉर्डिंग उपकरणं जप्त केली. या उपकरणांवरुन असं दिसून आलं की कॉल सेंटरचं प्राथमिक लक्ष्य परदेशात राहणारे इंग्रजी भाषिक नागरिक होते, ज्यांच्याशी संपर्क साधून बनावट वेबसाइट आणि पेमेंट पोर्टलद्वारे पैसे उकळले जात होते. प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की हे नेटवर्क आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे आणि त्याचे इतर राज्ये आणि देशांशी कनेक्शन असू शकतात.
संपूर्ण नेटवर्कमागील सूत्रधाराचा शोध सुरु (illegal call center scamming Americans)
प्राथमिक माहितीनुसार हे बेकायदेशीर कॉल सेंटर काही स्थानिक तरुणांनी भाड्यानं घेतलेल्या इमारतीतून चालवलं जात होतं, तर खरा वित्तपुरवठादार परदेशात आहे. गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस एकत्रितपणे टोळीच्या निधीचं, सॉफ्टवेअर नेटवर्कचं आणि कॉल डेटाचं विश्लेषण करत आहेत.











