India digital census 2027 : भारत सरकारनं 2027 मध्ये देशाची जनगणना करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. यापूर्वी 16 जून 2025 रोजी राजपत्रात जनगणना अधिसूचित करण्यात आली होती. केंद्रीय मंत्रिमंडळ समितीच्या निर्णयानुसार जातींची गणनाही होणार आहे. लेखी उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत जनगणनेची माहिती दिली. यासंदर्भात काँग्रेसचे खासदार चमला किरण कुमार रेड्डी आणि भाजपाचे खासदार एटेला राजेंद्र यांनी प्रश्न विचारला होता.
70 वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच जातींची गणना होणार आहे. तसंच भारतातील पहिली डिजिटल जनगणना असणाार आहे. यामध्ये मोबाइल अॲप्सद्वारे डेटा गोळा केला जाईल. तांत्रिक ठिकाणी समस्या असलेल्या ठिकाणी कागदपत्रांमधून डेटा गोळा केला जाणार असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं.
हे ही वाचा : राज्यात किती ठिकाणी किती झाले मतदान; जाणून घ्या आकडेवारी
2027 ची जनगणना दोन टप्प्यात :
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना राय म्हणाले, 2027 ची जनगणना दोन टप्प्यात केली जाणार आहे. जनगणनेला 150 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. पुढील जनगणना करण्यासाठी मागील जनगणनेतील धडे विचारात घेतले जातात. प्रत्येक जनगणनेपूर्वी, संबंधित भागधारकांकडूनही माहिती घेतली जाते. तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी जनगणना कार्यासाठी शिक्षकांना प्रगणक म्हणून नियुक्त केलं जाईल का, या प्रश्नावर राय म्हणाले, जनगणनेदरम्यान प्राथमिक शाळेतील शिक्षकांना प्रगणक म्हणून नियुक्त केलं जातं.
पहिला टप्पा – जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान होणार आहे. यामध्ये नियोजित घरांची यादी आणि गृहनिर्माण गणनेचा समावेश आहे.
दुसरा टप्पा – फेब्रुवारी 2027 मध्ये दुसऱ्या टप्प्यात जनगणना होणार आहे.
जनगणनेची पूर्वचाचणी :
जनगणना 1 मार्च 2027 रोजी होणार आहे. त्यामध्ये लडाख आणि बर्फाळ भागांसारख्या काही प्रदेशाचा अपवाद असणार आहे. अशा भागामध्ये सप्टेंबर 2026 मध्ये जनगणना होणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म, सर्वेक्षण पद्धती आणि लॉजिस्टिक्सची चाचणी घेण्यासाठी 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान एक जनगणना पूर्वचाचणी घेण्यात आली. कोविड-19 साथीच्या आजारामुळे 2021 च्या जनगणनेला विलंब झाला.









