तुम्हाला जर परदेशात जायचं असेल तर जास्तीत जास्त खर्च, करत विमानाने प्रवास करावा लागतो. परंतु आता तुम्ही परदेशात जाऊ इच्छित असाल तर विमानाने जास्त खर्च करत जाण्याची गरज नाही. कारण तुम्ही परदेशात जाण्यासाठी आता रेल्वेने प्रवास करू शकतात. ते ही कमी खर्चात.
केंद्र सरकारने भारत आणि भूतान या देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आज दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे दोन्ही देशातील संबंध भक्कम होतील. आणि व्यापार, पर्यटन वाढण्यास देखील मदत होऊ शकते. म्हणजेच तुम्हाला आता परदेशात जाण्यासाठी विमानप्रवासाची गरज भासणार नाही.
पश्चिम बंगालमधील हासिमारा या ठिकाणापर्यंत धावणारी रेल्वे भूतानमधील गेलेफूपर्यंत धावणार आहे. यामुळे आसाम मधील कोक्राझार ते भूतानमधील गेलेफूपर्यंत 69 किलोमीटरचा रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे. या रेल्वेमार्गासाठी 3 हजार 456 कोटींचा खर्च येणार आहे. तर दुसऱ्या प्रकल्पात पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समत्से या रूट दरम्यान 20 किलोमीटर लांब रेल्वे मार्ग बांधला जाणार असून यासाठी 577 कोटींचा खर्च येईल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून भारतीय बंदरे भूतानच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारत आणि भूतान या देशांमधील संबंध मजबूत होत आहे. समत्से आणि गेलेफू ही मुख्य निर्यात-आयात केंद्र असून या आर्थिक केंद्रांना भारतातून चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. भूतानमध्ये बांधण्यात येणारा हा पहिला रेल्वे प्रकल्प आहे. ज्यामुळे भारताला हा मार्ग थेट जोडतो. यामुळे वाहतूक सोपी होईल, तसेच पर्यटन वाढल्यामुळे रोजगारही निर्माण होईल.