Jaundice Patients in Kolhapur District: पंचगंगा नदीसह (panchganga river) जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पाण्यातील गंभीर प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६१ जणांना कावीळ (Jaundice) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी ४५ जणांना अॅक्युट हिपॅटायटिस (Acute Hepatitis) तर १६ जणांना तीव्र कावीळची लागण झाली आहे.
हे ही वाचा: होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू
मल-मूत्र थेट नद्यांमध्ये
प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे शहर व परिसरातील सांडपाणी, मल-मूत्र थेट नद्यांमध्ये सोडले जात आहे. यामुळे हिपॅटायटिस A आणि E सारखे विषाणू पाण्यात मिसळत असून, ते यकृतावर हल्ला करतात. यकृताला सूज येऊन रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढते आणि कावीळ होऊन रुग्णाला त्रास होतो. नदीपात्रातील जलवाहिन्यांच्या गळतीमुळेही हे विषाणू पसरत आहेत.
घरोघरी सर्वेक्षण
आरोग्य विभागाने याबाबत गंभीर पावले उचलली असून,आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. तसेच ओ.टी. टेस्ट द्वारे पाण्याची गुणवत्ता तपासली जात आहे. नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
साथरोगाचा धोका
पंचगंगा नदीत सतत सांडपाणी मिसळत असल्याने प्रदूषण कमी होत नाही. यामुळे साथरोगाचा धोका वाढला आहे. प्रशासनाने तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रभावीपणे राबवावेत आणि नद्यांच्या स्वच्छतेसाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनी स्वतःही पाण्याची काळजी घ्यावी आणि दूषित पाण्याचा वापर टाळावा.
कावीळची प्रमुख लक्षणे
– तीव्र थकवा जाणवणे
– भूक मंदावणे
– मळमळ, उलट्या येणे
– त्वचा व डोळे पिवळे पडणे
– लघवीचा रंग गडद पिवळा होणे
– ताप येणे
– पोटाच्या उजव्या बाजूला दुखणे
– अंगाला खाज सुटणे
तालुकानिहाय कावीळ रुग्णांची संख्या (सर्वाधिक प्रभावित ठिकाणे)
तालुका कावीळ रुग्णसंख्या
| कोल्हापूर शहर ३०
| राधानगरी १२
| शिरोळ ०९
| करवीर ०५
| हातकणंगले ०२
| भुदरगड ०१
| पन्हाळा ०१






