मुंबई : भारतीय रेल्वे राज्यातील लोकांना परवडणाऱ्या आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देऊन एक मोठी सुविधा देण्यास सज्ज आहे. रेल्वेनं सुरतच्या उधना रेल्वे स्थानकापासून ओडिशाच्या ब्रह्मपूर रेल्वे स्थानकापर्यंत अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक मोठ्या स्थानकांवरुन ही रेल्वे धावणार आहे. ही ट्रेन प्रामुख्याने सामान्य आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना परवडणारी असेल. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परवडणाऱ्या तिकिटांचा आणि आधुनिक सुविधांचा आनंद घेता येईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर ट्रेनचा मार्ग शेअर केला आहे.
कोणत्या मार्गावर धावणार :
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करताना म्हणाले, “ब्रह्मपूर ते उधना (सुरत) ही नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणारी सेवा आणि उच्च दर्जाचा प्रवास अनुभव प्रदान करेल.” गुजरातमधील उधना रेल्वे स्थानकावरुन निघणाऱ्या या नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनला ओडिशाकडे जाणाऱ्या अनेक प्रमुख स्थानकांवर थांबे असतील, ज्यात राज्यातील नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया या स्थानकांचा समावेश आहे. रेल्वेनं अद्याप अधिकृतपणे या ट्रेनच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केलेली नसली तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या 27 तारखेला त्याचं उद्घाटन करु शकतात असं मानलं जात आहे.
ताशी 160 ते 180 किमी वेगाने धावेल अमृत भारत :
अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा वेग अंदाजे 160 ते 180 किमी/ताशी असेल आणि त्यात एकूण 23 कोच असतील. यापैकी 11 सामान्य श्रेणीचे कोच, 8 स्लीपर श्रेणीचे कोच, 1 पेंट्री कार आणि 2 द्वितीय श्रेणीचे कोच असतील. याव्यतिरिक्त, एक कोच अपंग प्रवाशांसाठी समर्पित असेल. या ट्रेनच्या संचालनामुळं गुजरातजवळील इतर राज्यांमधून घरी परतणाऱ्या स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा मिळेल. आता त्यांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी परवडणारा आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध असेल. सुट्टीच्या हंगामातही, या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जलद आणि थेट कनेक्टिव्हिटीचा आनंद घेता येईल.
राज्यातून धावणारी तिसरी अमृत भारत ट्रेन :
भारतीय रेल्वेनं ‘अमृत भारत एक्सप्रेस’च्या माध्यमातून देशभरात प्रवासाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. ही नॉन-एसी सुपरफास्ट ट्रेन स्वस्त, जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय देत आहे. महाराष्ट्रात लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून बिहारमधील सहरसापर्यंत ही सेवा सुरु आहे. याशिवाय नुकतीच सुरु झालेली जोगबनी (बिहार) ते ईरोड (तामिळनाडू) ही अमृत भारत देखील राज्यातून धावते. त्यामुळं आता वंदे भारतसोबतच अमृत भारतचं जाळंही राज्यात वाढत आहे.
ही अमृत भारत ट्रेन राज्यातील कोणत्या स्थानकांवर थांबेल :
नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव जंक्शन, भुसावळ जंक्शन, मलकापूर, अकोला जंक्शन, बडनेरा जंक्शन, वर्धा, नागपूर जंक्शन, गोंदिया जंक्शन.