नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील चांदसाई घाटावर शनिवारी एक भीषण अपघात घडला, ज्यामुळं श्रद्धेची यात्रा शोकात रुपांतरित झाले. या दुर्दैवी अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कसा झाला अपघात :
प्राथमिक माहितीनुसार, भाविकांना घेऊन जाणारा पिकअप ट्रक चांदसाई घाटावर नियंत्रण गमावून उलटल्यानं हा अपघात झाला. पवित्र अष्टंबा यात्रा पूर्ण करुन सर्व प्रवासी घरी परतत होते. यादरम्यान घाटावरुन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅनमधून बाहेर काढलं आणि जवळच्या तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं.
घटनेनं परिसरात खळबळ :
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पिकअप उलटली तेव्हा मागच्या बाजूला बसलेले लोक गाडीखाली चिरडले गेले. अनेकांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस त्यांना वाचवण्यासाठी आले तेव्हा दृश्य हृदयद्रावक होतं. अनेक लोक रस्त्यावर पडले होते आणि वेदनेनं कण्हत होते. पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं बचावकार्य वेगानं सुरु आहे. मात्र या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.