नागपूर – भारताची सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत भारत एक्स्प्रेसची एक नवीन ट्रेन आता मध्य रेल्वेच्यानागपूर विभागातून धावणार आहे. मुजफ्फरपूर-चार्लापल्ली-मुज्जफरपूर ही ती नवीन सुपरफास्ट एक्स्प्रेस असून राज्यातील नागपूर आणि बल्लारशाह या दोन मोठ्या रेल्वे स्थानकावरून तिचं आवागमन होणार आहे.
अन्य रेल्वे गाड्यांच्या तुलनेत अधिक चांगल्या सोयीसुविधा आणि अतिजलद सेवा देणारी ट्रेन म्हणून अमृत भारत एक्स्प्रेसची ओळख आहे. 15294/15295 क्रमांकाची मुजफ्फूर चार्लापल्ली मजफ्फूरपूर ही नवीन सुपरफास्ट ट्रेन 14 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस प्रवाशांना ही गाडी सेवा देईल, असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मंगळवारी 14 ऑक्टोबरला सकाळी 10:40 वाजता मुजफ्फूरपूर रेल्वे स्थानकावरून प्रवासाला निघेल आणि तब्बल 38 तासांनंतर ती बुधवारी 15 ऑक्टोबरला रात्री 11:50 वाजता चार्लापल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचेल. यावेळी ही गाडी बुधवारी 15 ऑक्टोबरला दुपारी 12:50 वाजता नागपूर स्थानकावर तर सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी बल्लारशाह स्थानकावर पोहोचेल. या दोन्ही स्थानकावर पाच मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर ही गाडी पुढे प्रस्थान करेल.
त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 15295 चार्लापल्ली मुजफ्फुरपूर ही ट्रेन चार्लापल्ली स्थानकावरून गुरुवारी 16 ऑक्टोबरला पहाटे 4 वाजून 5 मिनिटांनी सुटेल आणि शुक्रवारी 17 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता मुजफ्फूरपूर स्थानकावर पोहोचेल. या दरम्यान ही गाडी बल्लारशाह स्थानकावर गुरुवारी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी तर नागपूर स्थानकावर दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल. दोन्ही स्थानकावर या गाडीला 5-5 मिनिटांचा थांबा आहे.
महाराष्ट्रासह सहा राज्यांना जोडणार : या दोन्ही गाड्यांना प्रत्येकी 22 कोच राहणार असून ही नवीन अमृत भारत एक्स्प्रेस बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना जोडणार आहे.
ऐन दिवाळी, छटपूजेनिमित्त नागपूर विभागातून आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. अशा वेळी ही नवीन सुपरफास्ट गाडी सुरू होणार असल्यानं प्रवाशांना अधिक सोयीचं होणार आहे.