Wife’s suicide : उल्हासनगरात शुल्लक कारणावरून कंत्राटी सफाई कामगाराची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर पतीच्या निर्घृण हत्येची माहिती कळताच पत्नीने देखील गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या अवल्या आहेत.
हल्ल्याची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प ३ परिसरात कचरा उचलण्याच्या क्षुल्लक कारणावरून आरोपी आणि मृत सफाई कामगार महादू जगताप यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने धारदार शस्त्राने जगताप यांच्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात गंभीरित्या जखमी झालेल्या महादू जगताप यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ल्याची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
पतीच्या हत्येनंतर पत्नीने आपली जीवनयात्रा संपवली
मात्र, पतीच्या निर्घृण हत्येनंतर मानसिक धक्यातून कामगाराच्या पत्नीने देखील गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत महादू जगताप हे उल्हासनगर कॅम्प १ मधील शहाड गावठाण येथे वास्तव्यास असून ते उल्हासनगरात कंत्राटी सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. पॅनल क्रमांक ११ मध्ये कर्तव्यावर असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
दरम्यान, पतीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांच्या पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या दुहेरी धक्कादायक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.











