Mamata Banerjee: आज बुधवार, ८ जुलै रोजी आंदोलनात पक्षाच्या कार्यकर्त्याला चक्क कानाखाली मारली आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या खास लेखातून.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आंदोलनादरम्यान त्या आपल्या पक्षातील एका कार्यकर्त्याला चपराक मारताना दिसत आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा: पुणेकरांनो लक्ष द्या! पालखी आगमनादिवशी शहरातील प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने राहणार बंद
व्हायरल व्हिडिओत नेमकं काय दिसतं?
सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आंदोलकांच्या गर्दीतून पुढे जाताना दिसतात. त्यावेळी एक कार्यकर्ता त्यांच्या सुरक्षेसाठी गर्दी नियंत्रित करण्याचा आणि त्यांच्यासाठी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, याचवेळी ममता बॅनर्जी यांनी अचानक संताप व्यक्त करत त्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
कालीघाट येथील निवासस्थानाबाहेरील घटना असल्याचा दावा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना कोलकात्यातील कालीघाट येथील ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या निवासस्थानाबाहेर घडल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या टीएमसी कार्यकर्त्यांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था सुरू होती. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक कार्यकर्ते भोवती उभे होते. याच गोंधळात ही घटना घडल्याचे वृत्त आहे.
आंदोलनावेळी टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे ११ वर्षीय मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान टीएमसी आणि भाजप समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याचे सांगितले जात आहे.
भाजपवर गंभीर आरोप
ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, न्यायालयाची परवानगी असूनही त्यांच्या मोर्चात अडथळे निर्माण करण्यात आले. तसेच भाजप समर्थकांनी टीएमसी कार्यकर्त्यांवर हल्ले करून मोर्चा विस्कळीत करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला.
पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
ममता बॅनर्जी यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी निष्पक्षपणे काम केले नाही आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आपल्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचाही दावा त्यांनी केला.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओबाबत तृणमूल काँग्रेसकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.











