काल (2 ऑक्टोबर 2025) रोजी देशभरात विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दसऱ्याच्या या पवित्र दिवशी देशभर रावणाचे पुतळे जाळून वाईटावर चांगल्याच्या विजयाचा जल्लोष केला जातो. यादरम्यान, अभिनेत्री सिमी गरेवाल यांचे एक ट्विट खूप व्हायरल असून हे ट्विट व्हायरल होण्याचं कारण देखील खास आहे. कारण, सिमी यांनी या ट्विटमध्ये रावणाबद्दल एक वेगळे मत मांडले आहे. सिमी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये पारंपरिक विचारधारेच्या अगदी उलट जाऊन रावणाला ‘थोडासा खोडकर’ असे म्हटले आहे. त्यामुळे सिमी यांचे हे ट्विट प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनले आहे.
काय आहे ट्विट?
सिमी गरेवाल यांनी या ट्विटमध्ये असं लिहलंय,की “डियर रावण… तुम्ही फक्त घाईगडबडीत एका महिलेचे अपहरण केले, पण त्यानंतर तुम्ही तिला तो आदर दिला जो आजकाल लोक सहसा महिलांना देत नाहीत. तुम्ही तिला चांगले जेवण दिले आणि महिला सुरक्षा रक्षक दिले. तुम्ही तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, पण तिने नकार दिल्यावर तुम्ही तिच्यावर कधीही तेजाब फेकले नाही. भगवान रामाने तुमचा वध केला, तेव्हा तुम्ही इतके समजूतदार होता की माफी मागत होता. मला वाटते, तुम्ही अर्ध्याहून अधिक संसदेतील सदस्यांपेक्षा जास्त सुशिक्षित होता. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला जाळण्यासाठी माझ्या मनात कोणतीही कठोर भावना नाही.”
सिमी यांचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय बनला असून यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
ट्विटमुळे गदारोळ
सिमी यांच्या या ट्विटमुळे चाहते आणि समीक्षक यांच्यात जोरदार वादविवाद सुरू असून काहींनी याला सर्जनशील विचार म्हटले, तर काहींनी रावणानं केलेल्या गुन्ह्यांचा (उदाहरणार्थ रंभा आणि वेदवती यांच्याशी गैरवर्तन) मुद्दा उपस्थित केला. तसेच, अभिनेत्रीने याकदे दुर्लक्ष केल्याची आठवण करून दिली. त्यामुळे, सिमी यांच्या या ट्विटमुळे समाजमाध्यमांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.