Mumbai Girgaon Hotel Raid: मुंबईतील गिरगाव परिसरातील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत संशयित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईदरम्यान एका अभिनेत्रीसह काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील गिरगाव परिसरातील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत संशयित देहव्यापार रॅकेट उघड केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी एक मराठी चित्रपटसृष्टीशी आणि दुसरी बंगाली तसेच हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. याशिवाय, सेलिब्रिटींसोबत काम करणाऱ्या एका मेकअप आर्टिस्टला संशयित दलाल म्हणून ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.
दरम्यान, कल्याण पूर्वेतील एका हॉटेलमध्ये संशयित देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला. या कारवाईत काही महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणाचा कथित सूत्रधार म्हणून एका महिला वकिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.
यापूर्वी नवी मुंबईतही मोठी कारवाई
याआधी नवी मुंबईतील एका लॉजवर टाकलेल्या छाप्यातही मानवी तस्करीशी संबंधित प्रकरण उघडकीस आले होते. त्या वेळी अनेक महिलांची सुटका करण्यात आली होती आणि संशयित दलालांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, महिलांना फसवून किंवा दबावाखाली अशा व्यवसायात ढकलल्याचा संशय असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला.
पोलिसांचे आवाहन
मानवी तस्करी किंवा अनैतिक देहव्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा कारवायांमधील प्राथमिक उद्दिष्ट पीडितांची सुटका, त्यांचे पुनर्वसन आणि आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे हे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






