मुंबई : मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नमो युवा रन फॉर नशामुक्त भारत’ या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमामागचा उद्देश तरुण पिढीला व्यसनमुक्तीचा संदेश देत राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासात सहभागी करून घेणे हा आहे.
‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर मुख्यमंत्र्यांचा भर
कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कायदा-सुव्यवस्थेची कडक अंमलबजावणी आणि पोलीस व्यवस्थेतील सुधारणा या देशाला महासत्ता बनविण्यात महत्त्वाच्या आहेत. राज्य सरकारने सायबर गुन्हे आणि अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून, व्यसनाधीनतेवर कठोर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तरुणाईला देशभक्तीचा संदेश
“नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई” ही संकल्पना या रनच्या माध्यमातून जनमानसात रुजवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मॅरेथॉनमुळे तरुणांमध्ये देशभक्तीची जाणीव अधिक दृढ होईल तसेच आत्मनिर्भरतेच्या दिशेने देशाला पुढे नेण्याची ऊर्जा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दिग्गजांचीही उपस्थित
या कार्यक्रमाला पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि मॅरेथॉन धावपटू मिलिंद सोमण यांची विशेष उपस्थिती होती.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईसोबतच परभणीसह इतर ठिकाणीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परभणीतील रनमध्ये सुमारे सहाशे विद्यार्थी सहभागी झाले. मॅरेथॉननंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक संदेशालाही अधोरेखित करण्यात आले.
व्यसनमुक्त भारताकडे एक पाऊल
या उपक्रमातून युवकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे, समाजसेवेत पुढे येण्याचे आणि देशहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. व्यसनमुक्तीबाबत सरकारच्या प्रयत्नांना समाजाचा सक्रिय पाठिंबा मिळाल्यास “नशामुक्त भारत” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकते, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.