नवी मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धघाटन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या महत्वपूर्ण कार्यक्रमामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. तर वाहतूक पोलिसांकडून महत्वपूर्ण निर्बंध लागू करण्यात आले आहे.
नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या व्हीव्हीआयपी कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी निर्बंध लावले असून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आल्या आहे.
या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बुधवारी सकाळच्या सुमारास 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर या वाहनांना रस्त्यावर थांबण्यास किंवा पार्क करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय घेण्यामागे पंतप्रधानांच्या ताफ्याच्या वाहतुकीवेळी कोणतीही ट्राफिक जाम होऊ नये हा मुख्य उद्धेश आहे.
अत्यावश्यक वाहने राहणार सुरु
अवजड वाहनांपैकी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही. यात रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन दल वाहने, सरकारी वाहने, प्रवाशांसाठी वाहतूक करणाऱ्या बस आणि अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्या यांचा समावेश असणारा आहे.
वाशी आणि ऐरोली याठिकाणी असलेल्या टोल नाक्यांवर अवजड वाहने नवी मुंबईत प्रवेश करू शकणार नाही. या साईडने येणाऱ्या वाहनांना टोल नाक्यावरच थांबवण्यात येईल. मुंबईच्या मार्गाने अटल सेतू मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना देखील नवी मुंबई मध्ये प्रवेश करण्यास बंदी आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
उभारण्यात आलेले हे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रदेशासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक मोठा नवा अध्याय सुरू होण्याच्या मार्गावर आहे. हे नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक आणि स्मार्ट सुविधापूर्ण असणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या बॅगेज 360 डिग्री बारकोड स्कॅनिग प्रणाली वापरण्यात आली असून यामुळे बॅगेज हाताळणं जलद आणि सोपं होईल. या ठिकाणी ग्रीन लेव्हल एअरपोर्टची संकल्पना राबवण्यात येत आहे, ज्यामुळे पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षमतेवर भर दिला जातोय.
अशी असेल संरचना
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे क्षेत्रफळ सुमारे १,१६० हेक्टर आहे. तर हे विमानतळ मुंबईच्या सध्याच्या मुख्य विमानतळापेक्षा अधिक मोठे आहे. या विमानतळाच्या रचनेत कमळाच्या फुलाचा आकार प्रेरणा म्हणजेच ज्यात नैसर्गिक प्रकाश आणि हरित तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलाय. याठिकाणी प्रवाशांसाठी आधुनिक चेक-इन झोन, जलद बॅगेज हँडलिंग प्रणाली, आरामदायक लाऊंज, फूड कोर्ट्स, रिटेल झोन आणि हरित ऊर्जा वापर यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. तर वाहतूक सुलभतेसाठी, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतू आणि सायन-पनवेल महामार्गासह विविध प्रमुख रस्ते विमानतळाशी जोडण्यात आलेय.