Vijay Stambh tribute ceremony administration ready : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी करण्यात आली असून सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन सज्ज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
सोहळा शांतता, संयमाने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, दरवर्षी साजरा होणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा हा महत्वाचा कार्यक्रम आहे. यावर्षी अधिक अनुयायी येण्याचे गृहीत धरून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे. नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचनाही लक्षात घेण्यात आल्या आहेत. सोहळा शांतता, संयम आणि त्याच उंचीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही डुडी यांनी केले.
आदी सुविधा मिळणार
जिल्हापरिषदेच्यावतीने २३ आरोग्य केंद्र, ४३ रुग्णवाहिका, १८ खासगी रुग्णालयातील २८६ खाटा आरक्षित, १५५ प्रशिक्षित मनुष्यबळ, उपहारगृह व टँकरकरिता ३३ तपासणी पथके, ८० घंटागाडी, शुद्ध पाण्याची व्यवस्थेसाठी १५० टँकर्स, पाणी भरण्याच्या ठिकाणी २०० कर्मचारी नियुक्त, २ हजार ८०० शौचालय, २६५ सफाई कामगार, २६० पर्यवेक्षण अधिकारी व कर्मचारी, ९ हिरकणी कक्ष आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. पेरणे, कोरेगाव भिमा ते पिंपळे जगताप रस्ता, ढरंगेवस्ती, कोरेगाव भिमा ते वाडेवस्ती आदी ठिकाणी रस्ते दुरुस्ती, पिण्याच्या पाणी भरण्याचे ठिकाणी मुरुम भरण्यासह शोषखड्डा करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : राज्यस्तरीय युवा महोत्सव २०२५-२६ जल्लोषात सुरू
२५१ ठिकाणी अत्याधुनिक सीसीटिव्ही कॅमेरे
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १ महानिरीक्षक, ३ पोलीस उपमहानिरीक्षक, २० पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, ८ राज्य राखीव पोलीस दल तुकड्या, ३ शिघ्र प्रतिसाद दल, १४ घातपात विरोधी पथक, १८ बीडीडीएस पथके, ६५० होमगार्ड, ४ हजार ७०० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण सोहळ्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता फेस रिकगनायजेशनकरिता २५१ ठिकाणी अत्याधुनिक सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. १९ ठिकाणी वाहनतळाच्या माध्यमातून २० हजार चारचाकी वाहनाची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
पीएमपीएलच्यावतीने ३१ डिसेंबर २०२५ रोजी ३७५, तर १ जानेवारी २०२६ रोजी १ हजार २६० पीएमपीएल बसेसचे नियोजन केले आहे. प्रत्येक बसवर दोन कर्मचारी, राखीव चालक, तांत्रिक कर्मचारी मिळून अशी ४ हजार २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. बार्टीच्यावतीने एकूण ३१० बुक स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने विजयस्तंभाला फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, परिसर डागडुजी, पत्रकार कक्ष, मंडप, परिसर सुशोभिकरण आदी व्यवस्था करण्यात आली आहे.












