पुणे : अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या निरषेधार्थ बिबवेवाडीतील नागरिकांनी स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. गेल्या दहा दिवसांपासून बिबवेवाडी परिसरातील जय हिंदनगर, त्रिमूर्तीनगर, श्रेयसनगर भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने महिला आणि नागरिकांनी स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलनकरून अधिकाऱ्यांना जाब विचारला तसेच सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी निवेदनही दिले.
बिबवेवाडीतील अपुऱ्या पाणी पुरवठ्यासाठी केलेले हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते अमोल परदेशी, संजय वाघमारे, सीमा बारड, स्नेहा परदेशी, छाया हातेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी व्यतीत परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
बिबवेवाडी परिसरातील पाणीपुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार समोर
बिबवेवाडी परिसरातील या ठिसूळ कारभारामुळे बिबवेवाडी अप्पर, अप्पर ओटा, श्रेयसनगर, शेळकेवस्ती, खडकेवस्ती, जय हिंदनगर आणि त्रिमूर्तीनगर या भागातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून या भागातील काही ठिकाणी अतिदाबाने पाणी सोडले जात आहे, तर काही ठिकाणी नागरिकांना पाणीच मिळत नाहीये. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची “हसू कि रडू” अशी अवस्था झाल्याचे दिसत आहे. पाणी सोडणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याने परिसरात अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी उद्धट उत्तरे दिल्याचे महिलांनी या वेळी सांगितले.
यासोबतच याविषयी प्रतिक्रिया देताना, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अप्पर, इंदिरानगर भागात पाणी सोडण्यासाठी असलेले कर्मचारी माजी लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील असल्यामुळे एका बाजूला पाणी सोडले जाते, तर दुसऱ्या बाजूला पाणी सोडले जात नाही, तसेच परिसरात अनधिकृत नळजोडणी देखील वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी,”परिसरातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करून नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल“, असे सांगितले.