पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गेल्याकाही दिवसापासून गुन्हेगारी वाढल्याचे दिसत आहे. अशातच आता नामांकित कॉलेजच्या परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.
पुण्यातील एमआयटी या नामांकित कॉलेजच्या आवारात एका वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना उघड झाली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मृतदेहाची ओळख पटवत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
या मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव सुभाष कामठे आहे. त्याचे वय 65 आहे. परंतु अद्यापही त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुभाष कामठे हे पुण्यातील फुरसुंगी परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुभाष कामठे हे गेल्या 2 दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. यासोबतच कामठे यांना दारूचे देखील व्यसन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
नामांकित एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. नेमकी ही हत्या आहे की आत्महत्या हे मात्र उघड झालेले नाही.