पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मालकीच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. हे प्रकरण आता जास्त चिघळल्याचे दिसत असून गौतमी पाटील अडचणीत सापडल्या आहेत.
पुणे येथील नवले पुलावर नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या स्वतःच्या मालकीच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. 30 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हा प्रकार उघड झाला होता. या घटनेत रिक्षाचालक समाजी मरगळे हे गंभीर जखमी झाले. आता रिक्षाचालकांच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील यांना अटक करण्याची मागणी केली आहे. या अपघातप्रसंगी नृत्यांगना गौतमी पाटील या त्या कार मध्ये नव्हत्या. परंतु तरीही या प्रकरणात त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलिसांना नृत्यांगना गौतमी पाटील विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहे. यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून गौतमी पाटील मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पुणे पोलसांनी या प्रकरणी गौतमी पाटील यांना शुक्रवारी नोटीस दिली होती. आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या अपघातानंतर गौतमी पाटील यांची अपघातग्रस्त कार घटनास्थळावरून हलविण्यासाठी टोईंग व्हॅन आणण्यात आली होती. ही टोईंग व्हॅन नेमकी आणली तरी कोणी ? याबाबतचा तपास पोलीस करत आहे. तर पोलीस तपासात सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात येणार असल्याची माहिती उघड झाली आहे.
नातेवाईकांचे पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
नृत्यांगना गौतमी पाटील या सेलिब्रिटी असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करताना मागेपुढे पहिल्या जात असल्याचा आरोप रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच त्यांनी तिला अटक करा या मागणीसाठी रिक्षा चालकांच्या नातेवाईकांनी सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते.
काय म्हणाले रिक्षाचालकाने नातेवाईक
30 सप्टेंबर रोजी आमचा भाऊ पहाटेच्या सुमारास पॅसेंजरची वाट पाहत होता. त्याचवेळी रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी मागून भरधाव आलेल्या एका कारने रिक्षाचालकाला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, रिक्षा तीनवेळा पलटी झाली आणि आमचा भाऊ जखमी होऊन रस्त्यावर पडला. या अपघातानंतर ज्या कारने धडक दिली, त्यामधील लोक खाली उतरले आणि निघून गेले. परंतु, अर्धा तासाने एक व्यक्ती पुन्हा आला आणि त्याने त्याच्यासोबत टोईंग व्हॅन आणली होती. टोईंग व्हॅनच्या क्रेनने गौतमी पाटीलची कार टो करुन घटनास्थळावरुन नेण्यात आली. परंतु, आमचा भाऊ जखमी अवस्थेत तसाच रस्त्यावर पडलॆला होता. रिक्षावाल्यांनी वेळीच मदत केली म्हणून आमच्या भावाचा जीव वाचला, असल्याचा आरोप रिक्षाचाकलाकाच्या नातेवाईकांनी केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गौतमी पाटील यांच्या कार चालकाला अटक केली होती. परंतु अपघातावेळी हा चालक नसल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय तपासणीसाठी दुसऱ्याच कोणत्यातरी व्यक्तीला ड्रायव्हर म्हणून उभे करण्यात आल्याचे उघड झाले.