पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजक, महिला स्वयंरोजगार गट आणि हौशी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी “दिवाळी मार्केट २०२५” या मार्केटचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरू असलेले हे मार्केट नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले.
लोणावळा वुमन्स फाउंडेशन यांच्या वतीने कुमार रिसॉर्ट, लोणावळा येथे ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी “दिवाळी मार्केट २०२५” चे आयोजित करण्यात आले होते. या भव्य उपक्रमाला नागरिकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवस चाललेल्या या मार्केटला तब्बल ३०,००० हून अधिक नागरिकांनी भेट देत दिवाळीची खरेदी आणि विविध उपक्रमांचा आनंद लुटला.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या लोणावळा वुमन्स फाउंडेशनचा उद्देश प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी आणि तिच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावे हा आहे. या ध्येयातून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी मार्केटचे आयोजन करण्यात आले. या मार्केटमध्ये फॅशन, ज्वेलरी, घरसजावटीच्या वस्तू, स्वादिष्ट फराळ, हँडमेड उत्पादने, लहान मुलांसाठी खेळ व मनोरंजन असे शेकडो स्टॉल्स लावण्यात आले होते. तसेच खवय्यांसाठी खास फूड झोन आणि दररोज आकर्षक लकी ड्रॉ या विशेष आकर्षणांनी उपस्थितांची मने जिंकली.
या यशस्वी आयोजनानंतर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. ब्रिंदा अनिश गणात्रा म्हणाल्या, “या वर्षी दिवाळी मार्केटला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. महिलांनी आणि स्थानिक उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांच्या कला, उत्पादने आणि आत्मविश्वासाला मिळालेलं हे व्यासपीठ आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. या माध्यमातून ‘व्होकल फॉर लोकल’ या उपक्रमाला निश्चितच नवी गती मिळाली आहे.”
या दोन दिवसीय उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर लोणावळा वुमन्स फाउंडेशनने पुढील काळात अशा आणखी उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.