गेल्या काही दिवसांपूर्वी जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेसंदर्भात भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जागा हडपल्याचा आरोप लगावण्यात आला होता. आता खासदार मुरलीधर मोहोळ यांनी हे आरोप प्रत्यारोप फेटाळून लावत त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.
रविवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्यावर लगावण्यात आलेले जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीसंबंधीत आरोप त्यांनी फेटाळले. आणि त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. त्यावेळी ते म्हणाले 30-35 वर्षापासून मी राजकारणात आहे. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं की, एका चुकीच्या बातमीने राजकीय कार्यकर्त्याचे करिअर उद्ध्वस्त होऊन मनोबल खच्चीकरण केले जाऊ शकते.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जमीनीच्या विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नसून ज्या गोखले बिल्डर्सशी माझी भागीदारी असल्याचे सांगितले जात आहे त्यांच्या दोन्ही कंपन्यांमधून मी वर्षभरापूर्वीच बाहेर पडलो. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. या कंपनीतून बाहेर पडल्याबाबतची सर्व कागदपत्रे सार्वजनिक उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
मी काही दिवसांपासून पुण्याबाहेर होतो. आज मी फक्त मला निवडून दिलेल्या पुणेकरांच्या मनात माझ्याबद्दल कोणतीही शंका उत्पन्न होऊ नये, यासाठी बोलत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी माझ्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहाराबाबत आरोप केले. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. ते माझ्याकडे दिल्लीत कामासाठी येतात. त्यांनी माझ्यावर इतका मोठा आरोप करताना मला विचारायला पाहिजे होते. मी त्यांना सत्य परिस्थिती समजावली असती. त्यांना जी माहिती मिळाली त्याच आधारावर त्यांनी माझ्यावर आरोप केले असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.