Pimpri Chinchwad civic progress : माजी पंतप्रधान भारतरत्न, इंदिरा गांधी यांनी देशाच्या विकास, स्वावलंबन आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले तर माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा पाया घालून अखंड भारताची निर्मिती केली, या थोर व्यक्तींच्या देशसेवेचा आणि सामाजिक कार्याचा आदर्श घेत महापालिका कार्य करत आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.
माजी पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच माजी उपपंतप्रधान लोहपुरूष,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
या अभिवादन कार्यक्रमास नगरसचिव मुकेश कोळप, उपआयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी “राष्ट्रीय संकल्प दिन” म्हणून तर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती “राष्ट्रीय एकता दिन” म्हणून साजरी करण्यात येते. (Pimpri Chinchwad civic progress)
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी “आम्ही अशी शपथ घेतो की, देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करू आणि देशातील बांधवांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीने आणि कार्यामुळे शक्य झालेल्या देशाच्या एकतेच्या भावनेतून आम्ही ही शपथ घेत आहोत तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले योगदान देण्याचा आम्ही संकल्प करतो.” अशी राष्ट्रीय एकतेची सामुहिक शपथ घेतली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.
या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी, देशाच्या ऐक्य, प्रगती आणि सामाजिक सलोख्यासाठी सातत्याने कार्यरत राहावे, हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल असे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या.












