पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दोन दिवसांपूर्वी ATS एटीएसने धडक कारवाई केली होती. आणि या कारवाईतून टेरर फंडिंग नेटवर्कशी संबंध असलेल्या 18 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. आता या कारवाईच्या माध्यमातून दहशदवादी नेटवर्कशी संबंधित असलेल्या प्रतिष्टित व्यक्तींचा संबंध असल्याचे उघड झाले आहे.
महाराष्ट्र एटीएसने पुण्यातील कोथरूड भागात कारवाई केली होती. या कारवाईच्या माध्यमातून दहशदवादी नेटवर्कमध्ये फक्त गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर नाही तर उच्च शिक्षित व्यक्ती, आयटी अभियंते, बँक कर्मचारी आणि ठेकेदार यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. यामुळे आता पुणे शहराच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या पथकाने केलेल्या कारवाईनंतर कोथरूड परिसरात टेरर फंडिंगसाठी काम करणाऱ्या नेटवर्कवर एटीएसने गुप्तरित्या नजर ठेवली होती. यावेळी तपास यंत्रणांनी निधी संकलन संबंधित व्यवहार, बँक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि सोशल मीडियावरील संवाद यांचा सखोलरीत्या तपास केला. या तपासामुळे या दहशदवादी नेटवर्क संबंधित असलेले राज्याबाहेरील आणि परदेशी (Foreign) घटकांशी असलेले संबंध समजण्यास महत्त्वपूर्ण मदत मिळाली आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची सुरुवात 2023 या वर्षी झाली होती. त्यावेळी कोथरूड परिसरात एका बाईक चोरीची घटना घडली होती. या घटनेतील काही आरोपींच्या चौकशीतून हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये कार्यरत एक डॉक्टरचे नाव समोर आले आहे. या डॉक्टरचे थेट संबंध काही दहशतवादी संघटनांशी जोडलेले असल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार एटीएसने कोंढवा परिसरातील नेटवर्कचा उलगडा केला, ज्यामुळे अनेक व्यक्ती या डॉक्टरच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले.
या ठिकाणी छापे
महाराष्ट एटीएस कारवाई वेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये कोंढवा, खडकी, वानवडी आणि पिंपरी-चिंचवडमधील बोहरा हाऊस यांसारख्या परिसरांचा सहभाग होता. या ठिकाणांवरून संशयितांची हालचाल, बैठका आणि टेरर फंडिंगशी संबंधित आर्थिक व्यवहारांचे महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले.
महाराष्ट्र एटीएसच्या या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता या प्रकरणानंतर घरमालक आणि सोसायट्यांमध्ये सतर्कता निर्माण झाली आहे. त्यांनी ओळखपत्राशिवाय भाडेकरू ठेवणे टाळावे अशी भावना व्यक्त केली आहे.












