पुणे : पुण्यातील गुन्हेगारी सातत्याने वाढत चालली आहे. यामुळे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार वारंवार चर्चेत असतात. आता ही ते चर्चेचा विषय बनले आहेत, मात्र वेगळ्याच कारणामुळे ते चर्चेत आले आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त सारसबागेतील महालक्ष्मी मंदिरात पूजेसाठी जाणार असताना पोलीस आयुक्तांसाठी आता रस्ते बंद करण्यात आले होते. यामुळे आता पोलीस आयुक्तांसाठी आता रस्ते बंद करण्याची नवी प्रथा पुण्यात सुरू झाली की काय?, असा प्रश्न पडावा असं चित्र पहायला मिळल. सारसबागमधील मंदिरात दर्शनासाठी पोलीस आयुक्त येणार असल्याने त्या भागातील सगळी वाहतूकच पोलिसांनी थांबवून ठेवल्याने, ज्यांच्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यामुळेच वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुणे पोलीस आयुक्त असेही वारंवार चर्चेत येत असतात. मात्र, आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार ज्या भागात जातात, तेथील रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सध्या पडलेली दिसतेय. या संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त येणार असल्याने पूर्ण रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आल्याचे दिसतंय.
स्वारगेटकडून सिंहगडकडे जाणारी वाहतूक थांबवली
सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात पोलीस आयुक्त दर्शनासाठी येणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी स्वारगेटकडून सिंहगडकडे जाणारी सर्व वाहतूक बंद केली होती. त्याचबरोबर मंदिरासमोरील चौकही बंद करण्यात आला होता. पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त होता की मुख्यमंत्रीच येणार आहेत अशा पद्धतीचे वातावरण तयार झाले होते. आधीच गेली दहा दिवस सारसबाग परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न एवढा गंभीर असताना तो सोडवायचं सोडून स्वतः पोलीस आयुक्त अशा व्हीव्हीआयपी पद्धतीने दौरे करणार असतील तर सर्वसामान्य पुणेकरांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होतो.
वाहतूक कोंडीवर पोलीस निष्क्रिय
आताच्या घडीला पुण्यात कुठली महत्त्वाची समस्या आहे?, असं जर कोणी विचारलं तर सर्व पुणेकर एक सुरात उत्तर देतील आणि ती म्हणजे वाहतूक कोंडीची. शाळा, कॉलेज किंवा ऑफिसच्या वेळी अर्धा तासाचे अंतर कापण्यासाठी किमान एक, सव्वा तास किंवा दीड तासही लागतो, इतका मोठा वाहतूक कोंडीचा प्रश्न पुणे शहराला सध्या भेडसावत आहे. मात्र, असं असताना देखील, कुठे जर वाहतूक कोंडी झालीच तर वाहतूक पोलीस फारसे प्रयत्न करताना दिसून येत नाहीत.
ज्यांच्यावर वाहतूक कोंडीची ही समस्या सोडवण्याची जबाबदारी आहे, ते पोलीस आयुक्त अशा पद्धतीने स्वतःसाठी व्हीव्हीआयपी सोय करून घेणार असतील तर सर्वसामान्य पुणेकरांचं काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.