Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • “आस्ते कदम..!! राजे येत आहेत!”, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमेचा टिझर प्रकाशित
Top News

“आस्ते कदम..!! राजे येत आहेत!”, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमेचा टिझर प्रकाशित

पुन्हा धमन्यांमध्ये सळसळणार भगवं रक्त, पुन्हा मराठ्यांचा दणका दाखवायला येत आहेतपुन्हा शिवाजीराजे भोसले“. “स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!” या दमदार घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्र विलक्षण सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाचा टिझर नुकताच प्रकाशित करण्यात आला असून हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. आजवर आपण कधीच पाहिलं असेल, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप या सिनेमामधून दिसणार असून मराठी भाषेची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी, अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती सिनेमाद्वारे दाखवण्यात आलं आहे.

एक नवा चेहरा साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

यावेळी मराठी इंडस्ट्रीतील एक नवा चेहरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ बोडके सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार असून सोबतीला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय, राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर चित्रपटाची कथा–पटकथा महेश मांजरेकर यांनी लिहिली असून दिग्दर्शनही महेश मांजरेकरांच असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. तसेच झी स्टुडिओज या प्रस्तुत करणार आहे. या सिनेमाचा टिझर पाहिल्यानंतर हे समजतंय कि, हा सिनेमा केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव न करता, आजच्या महाराष्ट्राशी आणि त्याच्या अनुत्तरित प्रश्नांशी देखील संवाद साधत आहे. त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

इतिहासासोबतच वर्तमानाला प्रश्न विचारणारा,जागणारा,दिशा दाखवणारा -महेश मांजरेकर

सिनेमा विषयी बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले की,”माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाशी भिडण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी केवळ स्वराज्य उभं राहिलं नाही, तर जनमानस जागृत झाले. आजच्या पिढीपुढे असलेल्या प्रश्नांकडे पाहाताना, त्यांच्या विचारांचा प्रकाश पडद्यावर आणायचा आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा प्रवास इतिहास सांगणारा तर असेलच, त्याचबरोबर वर्तमानाला प्रश्न विचारणारा, त्याला जागवणारा आणि दिशा दाखवणारा ठरेल. कलाकार म्हणून मी गप्प बसू शकत नाही आणि हा सिनेमा माझ्या अस्वस्थतेचा, माझ्या जिव्हाळ्याचा आवाज आहे,” अशी प्रगल्भ भूमिका महेश मांजरेकरांनी मांडली.

चित्रपटातून महाराज बोलणार आहेत – बवेश जानवलेकर

झी स्टुडिओज्चे मराठी व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले,”झी स्टुडिओज् आणि महेश मांजरेकर हे समीकरण कायमच यशस्वी राहिलंय. मराठीसाठी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा केवळ एक चित्रपट नसून महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी पुन्हा नातं जोडणारा प्रवास आहे. या सिनेमाशी जोडल्या गेल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. या चित्रपटातून महाराज बोलणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी नसून जगण्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडणारा आहे,” असं मत बवेश जानवालेकर यांनी व्यक्त केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं मोठी जबाबदारी : सिद्धार्थ बोडके

आपल्या भूमिकेविषयी अभिनेता सिद्धार्थ बोडके म्हणाला की, “छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मी पार पाडू शकेन, असा विश्वास महेश सरांनी माझ्यावर दाखवला, यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. प्रत्येक भूमिकेसाठी आपण अभ्यास करतोच, पण या चित्रपटातील माझा प्रवास विशेष होता. यात दाखवलेले शिवाजी महाराज हे प्रचंड संतप्त आहेत. कारण, आज आपल्या महाराष्ट्राची, मराठी माणसाची जी स्थिती आहे, ती पाहून कोणाच्याही मनात राग निर्माण होईल. हे वास्तव जेव्हा या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या समोर आलं, तेव्हा मी अस्वस्थ झालो, जर आज महाराजांनी ही परिस्थिती पाहिली असती, तर त्यांची भूमिका काय असती? हाच भाव मी या चित्रपटातील माझ्या अभिनयातून प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे,” असं म्हणत सिद्धेशने आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाचा तडफदार टिझर पाहून आणि कलाकारांनी व्यक्त केलेली भावना पाहून, नक्की महेश मांजरेकरांची हि कलाकृती देखील इतर चित्रपटांप्रमाणेच सुपर हिट ठरेल, असं दिसतंय. दरम्यान, सिनेमाचा टिझर पाहून प्रेक्षक या सिनेमाची उत्सुकतेने वाट पहात आहेत.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts