पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं असताना पुन्हा एकदा ससून रुग्णालय वादग्रस्त ठरले आहे. ससून रुग्णालयात एका मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या आत्महत्येच्या धक्कादायक घटनेने प्रशासन आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. आज (25 सप्टेंबर) सकाळी, मानसोपचारासाठी ऍडमिट असलेल्या एका रुग्णाने रुग्णालयाच्या ११व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव विजय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
अधिकार्यांच्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी विजय यांना रेल्वे पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले होते. याआधी त्यांनी ट्रेन समोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर विजय यांच्यावर मानसिक रोग विभागात उपचार सुरू होते. दरम्यान, आता ११व्या मजल्यावरून उडी मारून विजय यांनी आपले जीवन संपवले, ज्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी, अधिकारी व इतर सर्व हादरले आहेत.
पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली असून प्राथमिक तपासानुसार, विजय मानसिक आजाराने ग्रस्त होते. परंतु, रुग्णालयात उपचार घेत असतानाही त्यांनी आत्महत्या केलीच कशी?, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच, रुग्णालयातील सुरक्षा आणि उच्च मजल्यांवर प्रवेश नियंत्रित करण्याच्या उपाययोजनांवरही चिंता व्यक्त केली जात आहे.
रुग्ण सुरक्षेबाबत चिंता
ससून रुग्णालय हे पुण्यातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असून येथे दररोज हजारो रुग्णांचा उपचार केला जातो. अलीकडच्या काही आठवड्यांत रुग्णालयाच्या सुरक्षा व रुग्ण सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याआधी अपुऱ्या उपचारांमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सुद्धा चर्चेचा विषय ठरली होती.
विजयच्या मृत्यूनंतर अधिकारी मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांच्या सुरक्षिततेच्या प्रक्रियांचा पुनः परीक्षण करत आहेत. तर पोलिस याबाबत सविस्तर चौकशी करत आहेत. रुग्णालय प्रशासनालाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. या धक्कादायक घटनेने मानसिक आरोग्य सेवा, भावनिक आधार आणि सुरक्षा उपाययोजनांमध्ये गंभीर कमतरता असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पुण्यातील या नामांकित रुग्णालयात रुग्ण सुरक्षेच्या नव्याने चर्चा सुरू झाली आहे.