कोलकाता : खराब हवामानामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नादिया इथं आगमन उशिरा झालं. दाट धुक्यामुळं हेलिकॉप्टर उतरु शकलं नाही. पंतप्रधान मोदी विमानतळावरुन व्हर्च्युअल पद्धतीनं बैठकीत सहभागी झाले. दोन वेळा प्रयत्न करूनही दाट धुक्यामुळं हेलिकॉप्टर उतरू शकलं नाही.
पंतप्रधान मोदींनी मागितली माफी :
रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “बंगालमधील नादिया येथील कार्यक्रमस्थळी खराब हवामानामुळं पोहोचता आलं नाही याबद्दल मी माफी मागतो.” ताहिरपूर येथे फोनवरून बोलताना पंतप्रधान मोदींनी हे विधान केलं. पंतप्रधान मोदींनी व्हर्च्युअल पद्धतीनं संबोधित करताना म्हटलं, “मागासलेपणाशी झुंजणाऱ्या बंगालच्या दुर्गम भागांना आधुनिक कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. तृणमूल काँग्रेस मला आणि भाजपला कितीही विरोध करू शकते, परंतु बंगालची प्रगती थांबवू नये.”
बंगालमध्ये घुसखोरांना तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा :
पंतप्रधान मोदी म्हणाले की बिहार निवडणुकीच्या निकालांनी बंगालमध्ये भाजपच्या विजयाचे दरवाजे उघडले आहेत. बंगालमधील घुसखोरांना तृणमूल काँग्रेसकडून संरक्षण मिळते असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. घुसखोरांची ओळख पटू नये म्हणून तृणमूल काँग्रेस एसआयआरला विरोध करत असल्याचा दावा त्यांनी केला.
अधिकाऱ्यांनी घेतली विशेष बैठक :
पंतप्रधान मोदी नादियाला कसे पोहोचू शकतात यावर चर्चा करण्यासाठी कोलकाता विमानतळावरील अधिकाऱ्यांनी एक विशेष बैठक घेतली. हेलिकॉप्टर उतरवण्याचेही प्रयत्न करण्यात आले. पंतप्रधान मोदी आज सकाळी दिल्लीहून कोलकात्याला गेले. कोलकातामध्ये पोहोचल्यानंतर त्यांना नादियाला पोहोचण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागली.
3200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी :
पंतप्रधान मोदी नादियाला 3200 कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी येणार होते. या प्रकल्पांचं उद्दिष्ट राज्यातील रस्ते संपर्क सुधारणं आणि आर्थिक विकासाला चालना देणं आहे.












