मुंबई : महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळं शेतकऱ्यांची प्रचंड दैना झाली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा वेळी सरकारकडून तातडीची मदत मिळेल, अशी अपेक्षा असताना उलट वादग्रस्त वक्तव्यांमुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. पूरग्रस्त भागाच्या पाहणीवेळी भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानानं वातावरण तापले असून, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी त्यांना थेट सुनावलं आहे.
कडूंचा महाजनांना थेट सल्ला :
चंद्रपूर जिल्ह्यातील पाहणीदरम्यान गिरीश महाजन यांनी “मी पैसे घेऊन आलो नाही” असं विधान केलं. या वक्तव्यावर संताप व्यक्त करत बच्चू कडूंनी म्हटलं, “तुम्ही भाजपचे संकटमोचक असाल, पण आज खरी गरज आहे शेतकऱ्यांचे संकटमोचक होण्याची. जीभ सांभाळून बोला, कारण शेतकऱ्यांचे जखमेवर मीठ चोळणं योग्य नाही.” त्यांनी महाजनांना शब्दांचा विचारपूर्वक वापर करण्याचा सल्ला दिला.
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नको :
बच्चू कडूंनी पुढे स्पष्ट केलं की, शेतकऱ्यांचं उभं पीक वाहून गेलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्यांना आधाराची गरज आहे. “नेत्यांना जर चांगलं बोलता येत नसेल, तरी किमान शेतकऱ्यांचा अपमान करू नये,” अशा शब्दांत त्यांनी महाजनांना खडसावलं.
कर्जमाफी आणि मदतीची गरज :
गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. यासाठी त्यांनी उपोषणही केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा केली होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती स्थापनही करण्यात आली आहे. मात्र परतीच्या पावसामुळे यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये नुकसान प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत आणि आर्थिक आधार मिळावा, अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असताना, राजकीय नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्यं न करता त्यांना त्वरित मदत मिळवून देणं महत्त्वाचं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन काम केलं, तरच या संकटातून दिलासा मिळू शकतो.