मुंबई : महाराष्ट्रात अतिवृष्टी व पुरामुळं निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत आजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार यांनी आपल्या एका महिन्याचं संपूर्ण वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचं ठरवलं आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी पत्राद्वारे दिली.
राष्ट्रवादीचे मंत्री, खासदार, आमदार देणार एक महिन्याचे वेतन :
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः सहकारी मंत्र्यांसह पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. तिथं प्रत्यक्ष पाहणी करुन तातडीची मदत पोहोचवली जात आहे, असं सुनील तटकरे यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे. पुरामुळं अडचणीत सापडलेल्या नागरिकांना वेळेवर सहाय्य मिळावे, यासाठी प्रशासन सज्ज असून तातडीने उपाययोजना राबवल्या जात आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.
कठीण काळात राष्ट्रवादी शेतकरी, कामगारांसोबत :
या कठीण काळात शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी आहे, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. पुढील काही दिवसांत पूरग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी आणखी मदत व पूरक योजना जाहीर करण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून घरे, रस्ते आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेला वेतनदानाचा निर्णय पूरग्रस्तांसाठी नक्कीच दिलासा देणारा ठरु शकतो.