Offer of Chief Minister’s post : गेल्या काही काळापासून देशातील अनेक राज्यांच्या राजकारणात मोठे बदल पहायला मिळाले आहेत. आता राजकीय पक्षांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठं विधान केले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. तसेच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री व्हायचंय त्यांनी 100 आमदार घेऊन या
अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. अखिलेश यादव म्हणाले की, ‘ज्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्हायचे आहे त्यांनी 100 आमदार घेऊन यावे आणि मुख्यमंत्री बनावे. त्यांच्यासाठी ही एक आठवड्यासाठी ऑफर आहे. मी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना आधीच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेली आहे. चला पुन्हा एकदा ऑफर देऊया. त्यांना यापेक्षा चांगली ऑफर मिळणार नाही.’
दोन्ही नेते यादव यांच्या ऑफरला होकार देणार?
अखिलेश यादव हे पूर्वी फक्त केशव प्रसाद मौर्य यांना पक्षात आणण्याबाबत भाष्य करत होते. मात्र आता त्यांनी दुसरे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांना देखील पक्षात घेण्यास रस दाखवला आहे. पुढे बोलताना अखिलेश यादव यांनी जोडले आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते यादव यांच्या ऑफरला होकार देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी काळात उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सत्ता स्थापन करण्यासाठी 202 आमदारांचा पाठिंबा
दरम्यान, 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 403 पैकी भाजपने 255 आणि समाजवादी पार्टाने 111 जागा जिंकल्या होत्या. उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी 202 आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. अखिलेश यादव यांच्या पक्षाकडे 111 आमदार आहेत. यादव यांनी 100 आमदार घेऊन येणाऱ्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. एखाद्या नेत्याने 100 आमदार आणले तर सपाला समर्थन असणाऱ्या आमदारांची संख्या 211 होऊ शकते आणि तो नेता मुख्यमंत्री होऊ शकतो. आता आगामी काळात उत्तर प्रदेशात नेमकं काय घडणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.












